संविधान जनतेच्या आकांक्षांचा संकल्प -लेखक सुरेश सावंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘विचारवेध' अंतर्गत ‘माझे संविधान-माझा अभिमान' व्याख्यान संपन्न

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने साकारलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक त्यांच्या विचारांचा वारसा जपणारे असून, स्मारक पाहिले आणि मी भारावूनच गेलो अशा शब्दात संविधानाचे अभ्यासक, लेखक सुरेश सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच डॉ. आंबेडकर स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांना मूल्यवान ठेवा सापडल्याची अनुभूती येईल, असे ते म्हणाले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘संविधान दिन'चे औचित्य साधून पूर्वसंध्येला ऐरोली, सेक्टर-१५ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आयोजित ‘विचारवेध' या व्याख्यान शृंखलेअंतर्गत ‘माझे संविधान-माझा अभिमान' या विषयावर लेखक सुरेश सावंत यांनी श्रोत्यांशी सुसंवाद साधत ‘संविधान'च्या निर्मिती प्रक्रियेपासून त्याचे वर्तमानातील महत्व अत्यंत प्रभावीपणे अभिव्यक्त केले.

संविधान जनतेच्या आकांक्षांचा संकल्प असून आपल्या विकासाचा आराखडा आहे. नागरिक म्हणून आपल्या विकासाची सुरुवात ‘संविधान'मुळे होते असे म्हटले. आपल्याला उद्देशिका पाठ असते; मात्र तिचा अर्थ आपण समजून घेत नाही. उद्देशिकेतील प्रत्येक शब्द अत्यंत महत्वाचा असून तोलून मापून वापरलेला असल्याचे सांगत सुरेश सांवत यांनी उद्देशिका नीट समजून घेतली तर संविधान समजेल असे स्पष्ट करीत नानी पालखीवाला यांच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘उद्देशिका हे घटनेचे ओळखपत्र' असल्याचे म्हटले.

संविधान निर्मितीची प्रक्रिया समजून घेताना आपल्याला बहुपेडी भारतीय संस्कृती समजून घ्ोणे महत्वाचे आहे. इतिहासातील अनेक उदाहरणे देत संविधानातील ‘बंधुता' अर्थात ‘सहभाव' अतिशय महत्वाचा शब्द बाबासाहेबांची देन आहे. संविधान सभेमध्ये बाबासाहेबांची निवड, त्याची प्रक्रिया, त्यांची संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती, संविधान निर्मितीमधील त्यांचे योगदान, घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा होणारा गौरव अशा विविध बाबींवर सुरेश सावंत यांनी त्या कालखंडातील घटना, प्रसंग कथन करीत प्रकाशझोत टाकला.

यावेळी ‘संविधान दिन'चे औचित्य साधून शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात आयोजित करण्यात आलेल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, समाज विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, लेखक वक्ते सुरेश सावंत, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, ठाणे जिल्हा समाज कल्याण विभाग सहा. आयुक्त समाधान इंगळे आदिंच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करुन गौरविण्यात आले.

दरम्यान, ‘संविधान दिन'चे औचित्य साधून स्मारकातील समृध्द ग्रंथालयामध्ये संविधान विषयक साहित्याच्या ‘संविधान विशेष' या दालनाचा शुभारंभ आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी नगरसेविका सौ.हेमांगी सोनावणे, अब्दुल जब्बार खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

स्मारकातील अशा प्रकारच्या व्याख्यानांच्या सातत्यपूर्ण आयोजनातून बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती' या विचारांशी समरस होऊन काम करण्याचा आनंद मिळतो. ‘संविधान'सारखा विषय हिरा आहे त्याला स्मारकासारखे विचारप्रवर्तक कोंदण लाभले म्हणून सदर हिरा अधिक झळाळून निघाला आहे. सर्वसाधारपणे सांस्कृतिक शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या शहरांतही आता व्याख्यानांना फारशी गर्दी होत नसल्याचे चित्र दिसत असताना नवी मुंबईतील श्रोते स्मारकातील व्याख्यानांना मोठ्या संख्येने गर्दी करतात. सदर चित्र समाधान देणारे आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर न्यायालयात जिल्हा सत्र न्यायालय व कौटुंबिक न्यायालय सुरू होणार