‘संविधान दिन'निमित्त महापालिका मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन

नवी मुंबई ः ‘संविधान दिन'चे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ॲम्पिथिएटर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त मंगला माळवे, भांडार विभागाचे उपायुक्त अनंत जाधव, विधी अधिकारी अभय जाधव, कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे, सुनील लाड, शुभांगी दोडे, उपअभियंता सुधाकर मोरे आणि अधिकारी, कर्मचारी तसेच डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘संविधान दिन'निमित्त ‘संविधान'च्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, जवान, नागरिक यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी भारतीय ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव'चे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती-वाशी नवी मुंबई आणि ‘नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन' यांच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत असलेल्या विधी सेवा प्राधिकरणाबाबतच्या जनजागृतीपर उपक्रमांतर्गत महापालिकेचे विधी अधिकारी अभय जाधव यांनी उपस्थित डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.

कायद्याचे शिक्षण घेत असतानाच न्यायालयात जाऊन प्रत्यक्ष केसेस सुरू असताना उपस्थित राहून त्यांचे बारकाईने अवलोकन करावे. यामधून प्रत्यक्ष शिकायला मिळेल आणि अनुभवांत भर पडून त्याचा पुढे उपयोग होईल, अशा शब्दात अभय जाधव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रात्यक्षिक अभ्यासाची दिशा दाखविली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आपल्या मागण्यांसाठी राज्यभरातील खाजगी बस वाहतुकदार एकवटले