नवी मुंबई मधील कांदळवनावर १११ डोळ्यांची नजर

वाशी ः नवी मुंबई मधील कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी कांदळवन अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात आधीची ५१ आणि आता ४६ अशी एकूण १११ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, लवकरच सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता खाडीतील कांदळवनावर शासनाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोख नजर असणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील जागेला सोन्याचे भाव मिळत असल्याने काही असामाजिक तत्वांनी खाडीतील कांदळवनावर अतिक्रमण करुन जमिनी विकण्याचा, भाड्याने देण्याचा कारभार सुरु केला आहे. मात्र, या प्रकाराने कांदळवन सोबत खाडीतील जैवविविधता देखील नष्ट होत चालली आहे. त्यामुळे याबाबत आता राज्य शासन सजग झाले असून, या अतिक्रमणांवर नजर ठेवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा नर्िंणय तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षी घेण्यात आला होता. यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आता नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असल्याने खाडीतील अतिक्रमणाला चाप बसणार आहे.

कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम आणि मध्य मुंबई तर तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई, ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे. त्यासाठी वन खात्याकडून कॅमेरे सीसीटीव्ही व्ॉÀमेरे बसवण्याच्या हेतूने नुकतेच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणात एकूण १११ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. लवकरच या ठिकाणी कॅमेरे बसवण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी (कांदळवन संधारण, नवी मुंबई) सुधीर मांजरे यांनी दिली.

वाशी खाडी मध्ये मॅरेथॉन कारवाई

वाशी खाडी मध्ये अधिसूचित केलेल्या कांदळवनात तसेच सिडको जागेत डेब्रिजचा भराव टाकून आणि खारफुटीची कत्तल करुन त्या जागेत मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधून त्या भाड्याने देण्याचा प्रताप करण्यात आला होता. यावर वन विभाग, नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाने संयुक्तिक सलग चार दिवस मॅरेथॉन कारवाई करत ३५४  झोपड्यांवर कारवाई केली आहे. यातील अधिसूचित कांदळवनातील १०३ झोपड्यांवर वन विभागाने स्वतंत्र कारवाई करुन १० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

--

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 कोकण भवन येथे संविधान दिन उत्साहात साजरा