महापालिका आयुवतांकडून ऐरोलीतील सुविधा कामांची पाहणी
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली विभागात सुरु असलेल्या विविध प्रकल्प, सुविधा कामांची महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन कामे गतीमानतेने करीत विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले. त्याचप्रमाणे या कामांमध्ये गुणवत्ता राखण्याचे निर्देशित करुन यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी महेंद्र सप्रे, कार्यकारी अभियंता संजय दादासाहेब पाटील आणि इतर अधिकारी, वास्तुविशारद उपस्थित होते.
विस्तारीत पामबीच मार्गावरील घणसोली-ऐरोलीला जोडणाऱ्या खाडीवरील नियोजित पुलाच्या सद्यस्थितीची तसेच सदर मार्गाला मुंबई आणि ठाणेकडे जाण्यासाठी जोडावयाच्या प्रस्तावित मार्गाचीही सविस्तर आयुवतांनी माहिती जाणून घेतली. ऐरोली आणि घणसोली अशा दोन्ही बाजुने स्थळ पाहणी करीत प्रत्यक्ष नकाशा आणि गुगल मॅपवरुन आयुक्तांनी तेथील भौगोलिक स्थितीची माहिती घेतली. खाडीवरील साधारणतः १९५०मीटर लांबीच्या पुलाचे काम करण्याबाबत शासकिय पातळीवरुन आवश्यक परवानग्या प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि जलद कार्यवाही करावी, असे अधिकाऱ्यांना सूचित केले.
ऐरोली, सेक्टर-५ येथे सुरु असलेल्या नाट्यगृहाचा आराखडा नाट्यकर्मींना दाखवून त्यांच्याही मौलिक सूचना जाणून घ्याव्यात. नाट्यगृहात आलेल्या रसिकांना पार्कींगपासून उपहारगृहापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा सहजपणे उपलब्ध होतील याकडे आराखड्यामध्ये बारकाईने लक्ष देत कार्यवाही करावी. ऐरोली मुलुंड खाडीपुलापासून मुंर्ब्याकडे काटई मार्गे जाणाऱ्या पुलाच्या शेजारी सेक्टर-३ येथे सुरु असलेले ऐरोली अग्निशमन केंद्राचे काम एका महिन्याच्या कालावधीत गुणवत्ता राखून पूर्ण करण्याकडे अभियांत्रिकी विभागाने काटेकोर लक्ष द्यावे. त्याबाजुच्या भूस्तरीय आणि उच्चस्तरीय जलकुंभाचे कामही सुरु करण्याच्या दृष्टीने जलद कार्यवाही करावी. समता नगर येथील जलकुंभाच्या कामाची पाहणी करताना तेही काम विहित कालावधीत पूर्ण करून लवकरात लवकर आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा सुरु होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. ऐरोली, सेक्टर-१९ येथील मासळी आणि भाजी मार्केटचे काम पूर्णत्वास आले असून उर्वरित किरकोळ कामे करुन मार्केट लवकरात लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी. चिंचपाडा येथील घनकचऱ्यापासून बायोगॅस आणि वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त घरांतील नागरिकांना व्हावा या दृष्टीने सर्वेक्षण करुन कार्यवाही करण्याचे निर्देश आयुवत राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले.
दरम्यान, समता नगर येथील झिरो वेस्ट स्लम मॉडेल अंतर्गत सुरु असलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळाला भेट देत आयुक्तांनी तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच सदर काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे जाणून घ्ोतले. याठिकाणी ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे सूचित करतानाच तेथील संकलित सुका कचरा विक्रीतून येणारे उत्पन्न या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जाऊन त्याचा सुयोग्य विनियोग होत असल्याबद्दल आयुक्त नार्वेकर यांनी समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई महापालिका मार्फत नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचा दर्जा उत्तम राखणे. तसेच विहित कालावधीत त्या पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. त्याअनुषंगाने सुरु असलेल्या विविध प्रकल्प, सुविधा कामांची पाहणी करुन अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. क्षेत्रीय स्तरावरील अभियंत्यांना विभागात सुरु असलेल्या प्रकल्पांच्या बांधकामांकडे लक्ष देण्यासोबतच इतरही अभियांत्रिकी कामे तसेच स्वच्छ सर्वेक्षण विषयक कामे करण्याची जबाबदारी असल्यामुळे प्रकल्प कामांवरील देखरेखीची जबाबदारी एका वेगळ्या अभियंत्यांकडे सोपवावी. जेणेकरुन या कामांवर व्यवस्थित नियंत्रण राहील.