सर्व ग्रामीण महिला आर्थिक साक्षर होऊन सक्षम होण्यास मदत - डॉ. हेमंत वसेकर

नवी मुंबई ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जागतिक महिला बँक यांच्यामध्ये २५ नोव्हेंबर रोजी महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. या करारामुळे उमेद अभियान अंतर्गत कार्यरत सर्व ग्रामीण महिला आर्थिक साक्षर होऊन सक्षम होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन ‘अभियान'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले.

‘जागतिक महिला बँक'च्या क्षेत्रीय प्रमुख कल्पना अजयन आणि इतर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर सामंजस्य करार वाशी येथील सिडको कव्हेन्शन सेंटर येथे झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण आणि दुर्बल भागामध्ये बँकेच्या सुविधा पोहोचविण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर बी.सी. (बँक कोऑर्डिनेटर) सखी कार्यरत करण्यात येत आहे. या बी.सी. सखी ग्रामीण भागातील लोकांना बँकेतून पैसे काढणे, बील भरणा करणे आणि विविध विमा योजना यासारख्या सुविधा घरपोच पोहोचविते. या सुविधामधून बी.सी. सखींना बँकेद्वारे उपजीविकेच्या संधी प्राप्त होतात. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामीण व्यक्तीला बँकेच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात याकरिता या सखी कार्यरत करण्यात येत आहे.

सदर उपक्रम जलद गतीने होण्याकरिता ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान'द्वारे जागतिक महिला बँकसोबत सामंजस्य करार करण्यात करण्यात आला. सदर करारामुळे राज्यभरातील ‘अभियान'ला जोडलेल्या महिलांची आर्थिक साक्षरता वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने ग्रामीण महिलांची कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे, असे डॉ. हेमंत वसेकर यांनी सांगितले. कल्पना अजयन यांनी ‘उमेद अभियान'च्या चळवळी सोबत काम करुन ग्रामीण महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची सदरची संधी असल्याचे सांगितले.

सदर कराराच्या प्रसंगी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, धनवंत माळी, राज्य व्यवस्थापक कावेरी पवार, अभियान व्यवस्थापक धनश्री बिरंबोले तसेच जागतिक महिला बँक कडूनकल्पना अजयन, विभागीय प्रमुख पल्लवी मधोक, संचालक अजित अग्रवाल, प्रवीण वानखडे आणि नारायण खोसे उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘बाबूशेठ फाऊंडेशन'तर्फे किल्ला बनविणे, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार