१४ गावातील इच्छुकांना नवी मुंबई पालिकेची निवडणूक लढवता येईल की नाही?, याबाबत साशंकता
नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ठ १४ गावांच्या हद्दीचा तिढा कायम
वाशी ः शासन आदेशाने मुदत संपलेल्या सर्व महापालिकांची नव्याने प्रभाग रचना होणार आहे. मात्र, राज्य शासनाने नवी मुंबई महापालिका हद्दीत समावेश केलेल्या कल्याण तालुक्यातील १४ गावांची अंतिम अधिसूचना अद्याप निघाली नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीची नवीन प्रभाग रचना करताना सदर गावे वगळूनच प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यामुळे या १४ गावातील इच्छुकांना नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवता येईल की नाही?, याबाबत साशंकता आहे.
राज्यातील सर्व महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींची प्रभाग रचना नव्याने होणार आहे .महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश दिले आहेत. जनगणनेनुसार प्रभागांची संख्या आणि रचना निश्चित करुन प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी दिले आहेत. राज्यातील मुदत संपलेल्या आणि नजिकच्या कालावधीमध्ये मुदत संपत असलेल्या सर्व महापालिका संदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची देखील नवीन प्रभाग रचना होणार आहे. मात्र, नवी मुंबई महापालिका हद्दीत समावेश केलेल्या कल्याण तालुक्यातील १४ गावांच्या प्रभाग रचनेचा पेच नवी मुंबई महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांसमोर पडला आहे.
राज्य शासनाने ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुवयामधील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तरशीव आणि गोटेघर आदी १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली असली तरी त्याची अंतिम अधिसूचना अजून काढली नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची भौगोलिक हद्द वाढली नाही. नवी मुंबई महापालिकेची हद्द वाढली नसल्याने महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना करायची कशी?, असा नवीन पेच निर्माण झाला आहे. सदर १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावा, याकरिता या गावातील ग्रामस्थांनी मोठा संघर्ष केल्यानंतर शासनाने कल्याण तालुवयामधील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी या १४ गावातील ग्रामस्थ इच्छुक आहेत. मात्र, १४ गावे समावेशाची अंतिम अधिसूचना अजून निघालेली नसल्याने महापालिका हद्दीचा तिढा कायम राहणार आहे. त्यामुळे या १४ गावातील इच्छुकांना नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवता येईल की नाही?, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तरशीव आणि गोटेघर आदी १४ गावी गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावी म्हणून मागील आठवड्यात ठाणे जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत स्थायी समिती सभेपुढे १४ गावांचा विषय आला असता त्याला समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांनी एकमताने मंजुरी देत सदर प्रस्ताव पुढे ठाणे जिल्हा परिषदेकडे पाठविला असून, आता सदर १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा अंतिम आदेश शासन कधी काढते याकडे या १४ गावातील ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाने कल्याण तालुक्यातील १४ गावे जरी नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट केली असली तरी त्याची अंतिम अधिसूचना अजून काढली नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची भौगोलिक हद्द अजुनही जुनीच आहे. - सोमनाथ केकाण, नगररचनाकार - नवी मुंबई महापालिका.