महापालिका आरोग्य विभागाचे सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय सर्वसाधारण नागरिकांसाठी महत्वाचा वैद्यकीय आधार असून याठिकाणी दररोज मोठ्या संख्यने रुग्ण विविध आजारांवरील उपचारांसाठी येत असतात. नुकतीच या रुग्णालयामध्ये एक अत्यंत गुंतागुतीची पाठीच्या दुखण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. याबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शस्त्रक्रिया करणारे तज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांंचे कौतुक केले आहे.
६४ वर्षांच्या एका व्यक्तीला मागील २ वर्षांपासून पाठदुखी आणि पाठीमागे खालील डाव्या बाजुस तीव्र वेदना होत होत्या. दुखणे बळावल्याने आठ-दहा मिनिटे चालणेही त्यांच्यासाठी अशक्यप्राय झाले होते. याव्यक्तीची एमआरआय चाचणी केली असता त्यामध्ये लंबर कॅनल स्टेनोसिस अर्थात नसांमध्ये अत्यंत कमी जागा झाल्याचे निदर्शनास आले.
महापालिकेच्या नियोजित पीजी कॉलेजसाठी नियुक्त केलेले प्राध्यापक डॉ. प्रवीण पाडळकर आणि सहा. प्राध्यापक डॉ. सुमित सोनवणे यांनी सदर रुग्णाच्या रिपोर्टस्ची बारकाईने पाहणी करुन काहीशी कठीण असलेली शस्त्रक्रिया नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्येच करण्याचे निश्चित केले. स्पाइनल ॲनेस्थेसिया अंतर्गत लंबर डिकन्प्रेशनने सदर शस्त्रक्रिया १ तास १५ मिनिटांच्या कालावधीत डॉ. प्रवीण पाडळकर आणि डॉ. सुमित सोनवणे यांंच्या चमुने यशस्वीपणे पार पाडली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण त्याच्या लक्षणांपासून पूर्णपणे मुक्त होणार आहे.
सदर शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयाच्या रुग्णालयात साधारणतः २ ते २.५ लाख रुपये इतका खर्च आला असता. मात्र, नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील सदर शस्त्रक्रिया अगदी विनामूल्य यशस्वीपणे पार पडलेली आहे. महापालिका रुग्णालयामध्ये अनेक वर्षानंतर काहीशी कठीण अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली असून आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने ते एक महत्वाचे पाऊल आहे.