फॅमिली डॉक्टर तसा फॅमिली शेतकरी हवा ! 

शेतकऱ्याला बनवू या आपला कुटुंबस्नेही

फॅमिली डॉक्टर तसा फॅमिली शेतकरी हवा ! 

आपल्या आरोग्यासाठी जसा फॅमिली डॉक्टर असतो तशाच प्रकारे फॅमिली शेतकरी मित्राला जवळ केले पाहिजे. गेली ९-१० वर्षे रासायनिक व सेंद्रीय शेती याच्या अभ्यासातून व स्वतः आणि माझ्या वडीलांसोबत केलेल्या आमच्या शेतात (मु. पो. पांडे, ता. वाई, जि. सातारा) येथे केलेल्या प्रयोगांपासून आणि त्यातून मिळेलेल्या अनुभवापासून फॅमिली शेतकरी ही संकल्पना सुचली आहे.

नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनत चालली आहे. कारण रासायनिक शेतीमुळे दिवसेदिवस वाढत जाणरे पाण्याचे आणि जमिनीचे प्रदुषण यामुळे उत्पन्न होणारे नवनवीन रोग, सतत रसायनयुवत अन्न पिकवल्याने अन्नातून कमी झालेली पौष्टीकता आणि त्यामुळे अन्नातून मिळणारी ऊर्जा आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यामुळे होणारी संपुर्ण समाजाची सामुहीक हानी रोखणे आवश्यक बनते. मग यावर एक रामबाण उपाय.. म्हणजे आता समाजानेच जागृत होऊन नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अन्नाची मागणी केली पाहिजे. यासाठी आपण प्रथम समजून घेऊ की आपल्या नेहमीच्या अन्नातून पौष्टीकता कशी कमी होत गेली ते!  नैसर्गिक किंवा रासायनिक शेती यातील फरक आणि ती कशी पिकविली जाते? नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाय, देशी बैल यांच्यापासून मिळणाऱ्या शेणखत व मूत्रापासून तसेच इतर अशा नैसर्गिक घटकांचा वापर करुन पिकवलेली शेती म्हणजेच नैसर्गिक शेती. युरिया, डायमोनियम फॉस्फेट व इतर कृत्रिम खते व कीटकनाशके वापरून तसेच सेंद्रीय शेतीच्या नावाखाली वापरली जाणारी रसायनयुवत सेंद्रीय खते यांपासून केलेली शेती म्हणजे रासायनिक आणि सेंद्रीय शेती होय.

रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती पिकू शकत नाही ही संकल्पनाच अनेक शेतकऱ्यांना सहजरित्या मान्य होत नाही. सेंद्रीय शेती असो किंवा नैसर्गिक शेती.. या पद्धतीच्या वापराविषयी अनेक समज-गैरसमज आधीपासूनच पसरलेले आहेत. पारंपारिक शेतीच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढणे कठीण झाले आहे. पण अलीकडच्या काळात शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेती करण्याकडे कल व जागरूकता वाढू लागली आहे. शेती सुधारणांकडे शेतकरी लक्ष देऊ लागले आहेत.

अडचणी काय?

नैसर्गिक शेतीविषयी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचत नाही. या शेतीचा प्रयोग करणारा शेतकरी एकदा जरी अपयशी ठरला की, त्याची चर्चा झपाटयाने पसरते. उत्सुक शेतकऱ्यांमध्येही नैराश्य येते आणि त्यात भरीस भर म्हणून रासायनिक शेती करणारे त्याला वेड्यात काढतात. मुळात शेतीशास्त्र हे भारतीयांना वर्षांनुवर्षे अनुभवातून मिळत गेले शास्त्र आहे. भारतीय पूर्वज ज्या पद्धतीने शेती करीत होते.. त्याविषयी अभ्यास करून पाश्चात्य अभ्यासकांनीही त्याची स्तुती केली आहे. पण, आपल्याकडे मात्र या शेती पद्धतीला दुय्यम ठरवले गेले आहे. रासायनिक खते, कीड व रोगनाशके, तणनाशके यांच्या वापराकडे अधिक लक्ष दिले गेले आहे. यासाठी जाणीवपुर्वक पाश्चात कंपन्यांनी आपले एजंट तयार करुन त्यांच्याकरवी शेतकऱ्यांना विविध आमिषे देऊन आपल्या उत्पादनांचा खप वाढवला आहे. या रासायनिक खतांमुळे हेक्टरी उत्पादकता वाढल्याचे पाहून बहुतांश शेतकरी रासायनिक शेतीकडे झुकले खरे !  पण, आता त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.

रासायनिक खते धोकादायक कशी?

रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आपले आरोग्य बिघडले आहे. पिकांसाठी आवश्यक सूक्ष्म जिवाणू नष्ट होत चालले आहेत. उत्पादकतेवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. रासायनिक खतांमधून पिकांची भूक भागते का? तसेच कीडरोग नियंत्रणाचे सोपे उपाय कोणते आहेत? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडताना दिसत आहेत. कीडरोगांपायी आपले आर्थिक नुकसान होईल, हे गृहित धरून शेतकऱ्यांनी विषारी औषधाची फवारणी केल्याने मित्र कीड, मित्र बुरशी मोठया प्रमाणावर नष्ट होते आणि निसर्गाचे संतुलन तर बिघडतेच. शिवाय यामुळे ग्लोबल वॉर्मिंगही वाढत आहे,  हे शेतकऱ्यांना समजावून, विश्वासात घेऊन त्याचे होणारे दुष्परिणाम याचे प्रात्यक्षिकांसह व्यापक स्वरूपात मार्गदर्शन करणे आवश्यक आहेे. पण तेच केले न गेल्याने या शेतीचे खुपच नुकसान झाले आहे.

झिरो बजेट शेती व पाळेकर तंत्र नेमके  काय आहे?

 आता पद्मश्री सुभाष पाळेकर तंत्र समजुन शेतकरी त्यानुसार शेती करु लागला आहे ही सर्व शेतकऱ्यांसाठी आणि  समाजासाठी खुप महत्वाची व आशादायक बाब आहे. सुभाष पाळेकर झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकवण्यासाठी देशभर फिरत असतात, ठिकठिकाणी मोफत शिबिरे घेतात. त्यांचे कार्य दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेष परिचयाचे आहे. सुभाष पाळेकर यांना २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले, तेव्हा ते आंध्र प्रदेशातील एका शिबिरात मार्गदर्शन करत होते. सहा हजार शेतकरी त्या शिबिरात होते. काय आहे हे पाळेकर तंत्र? झिरो बजेट शेतीत ओलिताच्या शेतीत जेवढे पाणी लागते, त्यांच्या केवळ दहा टक्के पाणी आणि दहा टक्के वीज लागते. पण तरीही उत्पादन मात्र अजिबात कमी येत नाही. शिवाय जे उत्पादन मिळेल विषमुक्त, पौष्टिक आणि उत्कृष्ट चवीचे असते असा  सुभाष पाळेकर यांचा ठाम दावा व विश्वास आहे. पाळेकर तंत्राच्या नैसर्गिक शेतमालाला बाजारात मागणी आहे आणि त्याला दीडपट ते दुप्पट भाव मिळतो. त्या तंत्रातून जमीन सुपीक व समृद्ध बनते. पाळेकर यांनी आठ वर्षांच्या संशोधनानंतर त्या तंत्राची सिद्धता केली आहे. नैसर्गिक शेती ग्लोबल वॉर्मिग रोखण्यास मदत करते. शेती ही निसर्गाने वाढवलेली आहे. त्यात मानवाची भूमिका ही सहाय्यकाची आहे. मानव हा कृषितंत्राचा निर्माता नाही. गव्हाचा दाणा, ज्वारीचा दाणा कारखान्यात तयार होऊ शकत नाही. ते माणसाचे सामर्थ्य नाही. पिके किंवा फळझाडे ही सर्व अन्नद्रव्ये जमिनीतून घ्ोतात.

अन्य राज्ये लाभार्थी; पण महाराष्ट्रात पाळेकर तंत्र काहीसे उपेक्षित.. 

पद्मश्री सुभाष पाळेकरांनी स्वतः प्रयोग केल्यामुळे ह्या विषयावर त्यांच्याकडे संपूर्ण व तपशीलवार माहिती आहे. त्यांनी पुस्तक, व्याख्याने आणि शिबिरे यांच्या माध्यमातून या झिरो बजेट शेतीचा प्रसार चालवला आहे. देशात चाळीस लाख शेतकरी झिरो बजेट नैसर्गिक शेती करत आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांत झिरो बजेट शेती करणारे शेतकरी जास्त आहेत. महाराष्ट्रात मात्र पाळेकर तंत्र काहीसे उपेक्षित राहिले आहे याची खंत पाळेकरांना वाटत असते. त्यांच्या वेबसाईटचा वापर करून अमेरिका, आफ्रिका या देशांतही काही शेतकरी पाळेकर तंत्राचा उपयोग करत आहेत.  मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पिक बोनस म्हणून घेणे म्हणजे झिरो बजेट अशी सुभाष पाळेकर यांची सहज-सोपी संकल्पना आहे. झिरो बजेट या त्यांच्या संकल्पनेत नैसर्गिक शेतीचा मंत्र दडलेला आहे. त्या शेतीत विकत काहीच घ्यावे लागत नाही. एका देशी गायीपासून मिळणारे शेण आणि मूत्र यांपासून तीस एकर शेती कसता येते असा सुभाष पाळेकर यांचा दावा आहे. जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात. त्यांच्यात अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत नाही. मात्र मनुष्य रासायनिक पद्धतीने शेती करतो, तेव्हा त्यात काही कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे का व्हावे? मानवाने अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीत रासायनिक घटकांचा वापर सुरू केला, पण त्यातून चक्र बिघडले. माती आणि इतर सर्व संसाधने यांच्याकडून अधिक ओरबाडून घ्ोण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे निसर्गाचे शोषण वाढले.

यामुळे रोज सामान्यांच्या ताटात येणाऱ्या भाज्यांपासून ते अन्नधान्यापर्यंत सगळेच विषयुक्त आहे.या विषयुक्त खाद्यपदार्थांमुळे पिढ्यांमधील रोगप्रतिकारशक्ती नष्ट होऊन शरीर आजारांना, रोगांना बळी पडत आहे. यासाठीच आपल्याला चांगले निसैर्गिक रित्या पिकवलेले अन्न हवे असेल तर आपला जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा एक फॅमिली शेतकरी असला पाहिजे. (उर्वरित पुढील लेखात)

- मनोज गोळे (ठाणे प्रतिनिधी)

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महावितरण'तर्फे महामोहिमेत कारवाईचा शॉक