‘गोवर'चा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवा -जिल्हाधिकारी शिनगारे

ठाणे ः ठाणे जिल्ह्यात गोवर रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळतात तेथे सर्व्हे करावा आणि विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
गोवर रोगासंबंधी उपाययोजनांसंदर्भात २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा, महापालिका, नगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांची तातडीची बैठक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्यासह जिल्ह्यातील विविध नगरपालिका, महापालिका आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणांचे वैद्यकीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. गोवर रोगाची सध्याची जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे याची माहिती जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी घेतली.

गोवर रोगाची व्याप्ती वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे. संशयित बालकांची तातडीने चाचणी करुन नमुने प्रयोगशाळेत पाठवावे. तसेच ज्या भागात असे रुग्ण आढळले तेथे जास्त लक्ष द्यावे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे साधारणपणे लसीचा भरपूर साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यक तेथे लस पोचविण्यासाठी व्यवस्था यंत्रणेने करावी. लसीकरणात कुठलीही कमतरता ठेवू नये. किती बालकांना लस अद्यापपर्यंत दिली नाही, त्याची माहिती अद्ययावत ठेवून त्यांच्यापर्यंत लस पोहोचेल याची व्यवस्था संबंधित आरोग्य यंत्रणेने करावी. लसीकरणासदंर्भात पालकांची जनजागृती करावी, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी सूचित केले.

 जिल्ह्यात गोवर लसीची कमतरता नाही. जेथे लसीकरण झाले आहे, त्या ठिकाणी गोवरचे संशयित रुग्ण कमी आढळले आहेत. त्यामुळे लसीकरणाचे विशेष शिबिराचे आयोजन करावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे म्हणाले.

दरम्यान, रोगाच्या संशयित बालकांना व्हिटॅमिन एचे डोस द्यावेत. तसेच अंगावर पुरळ आणि ताप असणाऱ्या बालकांना विलगीकरणात ठेवण्यासाठी तयारी करावी. ज्या भागात संशियत जास्त आढळतात तेथे तातडीने सर्वेक्षण सुरु करावे, अशा सूचना डॉ. कैलास पवार यांनी यावेळी दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पारसिक हिल उतारावर खोदकामासाठी ‘सिडको'चा बिल्डरसोबत करार