मेडीकव्हर हॉस्पिटल्समध्ये रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी

नवी मुंबई ः उपजीविकेसाठी दिवस तसेच रात्रपाळी करुन रिक्षा आणि टॅक्सी चालक अथक परिश्रम घेत असतात आणि अशावेळी आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. या चालकांमधील आरोग्य समस्या जाणून घेत त्यांना योग्य मार्गदर्शनाकरिता मेडीकव्हर हॉस्पिटल्सने पुढाकार घेत १८ नोव्हेंबर पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शिबिरात नवी मुंबईतील ४०० हुन अधिक ऑटोरिक्षा आणि २०० टॅक्सी चालकांना निदान आणि सल्लामसलत यासह आरोग्य सेवा पुरवणार आहे.

मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे १८ नोव्हेंबर रोजी उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी मेडीकव्हर हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स तसेच ऑटोरिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर युनियनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच मेडीकव्हर हॉस्पिटल तर्फे टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मोफत आरोग्य तपासणी कुपन्सचे वाटप करण्यात आले. रुग्णालयातच मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कुपन आणि नोंदणीनुसार भेटीची वेळ रुग्णालयामार्फत दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांना कामाच्या वेळेत फार वेळ प्रतिक्षा करावी लागणार नाही. आरोग्य शिबिरादरम्यान सीबीसी, रक्तातील साखर, ईसीजी, सीरम कोलेस्टेरॉल आणि सीरम क्रिएटिनिन यासारख्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. चाचण्यांसोबतच डॉक्टरांचा सल्ला सेवा देखील प्रदान केली जाईल.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘गोवर'चा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवा -जिल्हाधिकारी शिनगारे