सुविधा कामे विहित वेळेत, गुणवत्तापूर्ण करण्यावर भर द्या -राजेश नार्वेकर

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका मार्फत सुरु असलेली कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. सदर कामांचा सातत्याने पाठपुरावा करुन अपेक्षित कालावधीत नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुखांना आढावा बैठकीप्रसंगी दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेताना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रत्येक विभागामार्फत तत्परतेने करावयाच्या कामांचा तसेच नियोजित कामांची सविस्तर माहिती घेतली. केंद्र सरकारच्या वतीने सुरु असलेल्या निवास योग्य शहरांच्या सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईतील जास्तीत जास्त नागरिकांनी अभिप्राय नोंदविण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचावे. त्यांचे अभिप्राय प्ूूज्ः//ंग्ू.त्ब्/3ध्ंज्ध्ी9 या लिंकवर नोंदविले जावेत याविषयी कृतीशील कार्यवाही करावी, असे सर्व विभागप्रमुखांना सूचित करण्यात आले.

यावेळी आयुवतांनी महापालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक औषध उपलब्धतेबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. घणसोली येथील बांधकाम सुरु असलेल्या नागरी आरोग्य केंद्राचे काम या महिना अखेरपर्यंत पूर्ण करुन नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्याची कार्यवाही तत्परतेने करावी. कोव्हीड केंद्रातील बेडस्‌ आणि इतर साहित्य पुनर्वापरात आणण्याबाबत शासकीय स्तरावर पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करावा. झोपडपट्टी तेथे ग्रंथालय अशी संकल्पना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी. मार्केटच्या वास्तू वापरात आणण्याच्या दृष्टीने ओटले वाटपाची कार्यवाही लवकरात लवकर करुन घ्यावा. तसेच फेरीवाला धोरण अंमलात आणून उचित कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

‘सिडको'ने दिव्यांग स्टॉल्ससाठी उपलब्ध करुन दिलेल्या प्लॉटवर लवकरात लवकर दिव्यांग सन्मान किऑक्स बसवून ते वापरात येतील याबाबतची कार्यवाही गतीमानतेने करावी. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा, स्टॉल उपलब्ध करुन देण्याबाबतची सोडत उत्तम रितीने पारदर्शक पध्दतीने पार पडली असून स्टॉल धारकांना लवकरात लवकर प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करता येईल यादृष्टीने तत्पर कार्यवाही करावी. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम लिडार तंत्रज्ञानाद्वारे सुरु असून ते या वर्षाअखेरपर्यंत व्यवस्थित नियोजन करुन पूर्ण करावे. जेणेकरुन जानेवारी ते मार्च या कालावधीत कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन आगामी एप्रिल २०२३ पासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षात मालमत्तांना नवीन देयके देणे शक्य होईल, अशाही सूचना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिल्या.

नवी मुंबई महापालिकेची मंगल कार्यालये सुव्यवस्थित रितीने सुरु असून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या लग्न आणि इतर समारंभासाठी लाभदायक ठरत आहेत. त्या अनुषंगाने आगामी लग्नसराईचा कालावधी लक्षात घेऊन त्याठिकाणी आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने करुन घ्यावीत. विभाग अधिकारी यांनी आपापल्या क्षेत्रातील मंगल कार्यालयांची पाहणी करुन त्यामधील आवश्यक गोष्टींचा अहवाल विभाग प्रमुखांकडे सादर करावा. विभागप्रमुखांनी ती कामे प्राधान्याने संबंधित विभागांकडून करुन घ्यावीत. असेही निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी बैठकीत दिले.

स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर असणारे व मानांकन उंचाविणारे शहर ही नवी मुंबईची ओळख असून तशा प्रकारच्या अपेक्षा शासन स्तरावरून व नागरिकांकडूनही व्यक्त केल्या जातात. त्यामुळे आपली जबाबदारी मोठी असून ‘निश्चय केला- नंबर पहिला' असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनबध्द आणि गतीमानतेने कामे करावीत. स्वच्छता विषयक छोट्या छोट्या बाबींकडे बारकाईने लक्ष द्यावे. स्वच्छता विषयक कामांचा विभागनिहाय आढावा मी स्वतः घेणार आहे. एकंदरीतच नवी मुंबई महापालिका सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याने महापालिकाकडून जनतेच्या आणि शासनाच्या मोठ्या अपेक्षा असल्याने त्यादृष्टीने प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण होईल याकडे काटेकोर लक्ष द्यावे. -राजेश नार्वेकर, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मेडीकव्हर हॉस्पिटल्समध्ये रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी