एपीएमसी मध्ये अवजड वाहनांची दुहेरी  पार्किंग

वाशी ः वाशी, सेक्टर-१९ एपीएमसी मार्केट परिसरात महापालिकेच्या वतीने काही रस्त्यांवर पे अँन्ड पार्किंग साठी जागा दिली आहे. मात्र, या ठिकाणी  पार्किंगच्या नावाखाली अवजड वाहनांची तसेच नो-पार्किंग असलेल्या रस्त्यावर देखील दुहेरी पार्किंग करुन रस्ता अडवला जात आहे. सदर प्रक्राराकडे एपीएमसी वाहतूक पोलीस आणि महापालिका अतिक्रमण विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य वाहन चालकांना होत आहे. त्यामुळे सदर ठिकाणी फक्त हलक्या वाहनांसाठी  पार्किंग  ठेवण्याची मागणी होत आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून एपीएमसी बाजार समितीची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी रोज अडीच हजाराच्या घरात शेतमाल घेऊन माल वाहने येत असतात. मात्र, येथील एकमेव असलेले ट्रक टर्मिनल बंद करुन ‘सिडको'ने त्या जागी गृहनिर्माण प्रकल्प सुरु केला आहे. परिणामी, येथील मालवाहू वाहनांच्या  पार्किंग ची समस्या जटील झाली आहे. अशा परिस्थतीमध्ये महापालिका मालमत्ता विभागाने येथील  देवी प्रसाद हॉटेल ते शालिमार हॉटेल आणि माथाडी चौक ते पुनित चेंबर अशा दोन ठिकाणी पे अँड पार्क दिले आहेत. त्यामुळे सुलभ  पार्किंग  केले जाते.

दुसरीकडे सदर  पार्किंग एकेरी वाहनांसाठी असताना येथे रोज दुहेरी वाहन  पार्किंग  केली जाते. तर जलाराम चौक ते शालिमार हॉटेल, मध्यवर्ती सुविधा केंद्र समोरील रस्ता नो- पार्किंग   झोन आहे. मात्र, येथे होणाऱ्या दुहेरी वाहने  पार्किंग  कडे  एपीएमसी वाहतूक पोलीस आणि महापालिका अतिक्रण विभाग अर्थपूर्ण  दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा सर्वसामान्य वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे येथील अवजड वाहनांची पार्किंग बंद करुन फक्त हलक्या वाहनांसाठी  पार्किंग  ठेवावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

एपीएमसी परिसरात जर रस्त्यावर मालवाहू वाहनांची दुहेरी  पार्किंग  होत असेल तर अशा वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना एपीएमसी वाहतूक शाखेला देण्यात येतील.
-तिरुपती काकडे, उपायुक्त-वाहतूक विभाग, नवी मुंबई पोलीस. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोला पामबीच येथील भूखंडासाठी ५,५४,०८९ रुपये प्रति चौरस मीटर दर प्राप्त