आयकॉनिक महापालिका मुख्यालय वास्तुला निळी झळाळी

नवी मुंबई ः २० नोव्हेंबरचा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त युनिसेफ या जागतिक पातळीवर कार्यरत नामांकित संस्थेच्या वतीने संपूर्ण जगभरात विविध देशांमध्ये निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.

नवी मुंबई महापालिकेची मुख्यालय वास्तू भारतातील वास्तुरचनेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ‘युनिसेफ'च्या भारतातील प्रमुखांच्या वतीने आंतरराष्ट्रीय बाल दिनानिमित्त महापालिकेच्या आयकॉनिक मुख्यालय वास्तुला प्रतिकात्मक रितीने निळ्या रंगाची प्रकाशयोजना करावी, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरराष्ट्रीय बाल दिनाच्या आदल्या आणि नंतरच्या दिवशी म्हणजेच १९, २० आणि नोव्हेंबर असे तीन दिवस नवी मुंबई महापालिकेची मुख्यालय इमारत निळ्या रंगात उजळून निघते आहे.

आंतरराष्ट्रीय बाल दिनाचे यावर्षीचे उद्दिष्ट ‘मुलांचा खेळण्याचा हक्क' असून या माध्यमातून मुलांच्या जडण-घडणीतील खेळाचे महत्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होते. शिवाय विविध कौशल्यांचा विकास होतो, निर्णयक्षमता वाढते, सांघिक भावना निर्माण होते आणि या माध्यमातून त्यांचे व्यक्तिमत्व सक्षमीकरण होते. त्यामुळे यावर्षी खेळाच्या माध्यमातून मुलांचा विकास असे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिकेने नेहमीच शहरातील मुलांच्या क्रीडा विकासासाठी आवश्यक सुविधा आणि पोषक वातावरण निर्मिती केलेली आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय नजरेसमोर ठेवून दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच सुरु झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा महोत्सव मध्ये ४८ हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये ३००हून अधिक शाळांमधील ३० हजारहुन अधिक स्पर्धक स्वतःच्या अंगभूत क्रीडा गुणांचे प्रदर्शन करीत आहेत. त्यामुळे ‘युनिसेफ'च्या विनंतीनुसार महापालिका मुख्यालयास करण्यात आलेली निळ्या रंगातली झळाळी नवी मुंबईकर मुलांच्या क्रीडा विकासाचे प्रतिक ठरत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी मध्ये अवजड वाहनांची दुहेरी  पार्किंग