मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देणार -चंदू पाटील

नवी मुंबई ः मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी राज्याबरोबरच केंद्राच्याही अनेक योजना असल्या तरी त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस मच्छीमार सेल'चे प्रदेशाध्यक्ष चंदू पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच शासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार चंदू पाटील यांनी ‘मच्छीमार सेल'च्या आढावा बैठकीत केला. कोळी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी २० नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रवादी काँग्रेस मच्छीमार सेल'ची कार्यकारी समितीची आढावा बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीत चंदू पाटील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे राष्ट्रीय नेते शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, ‘राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर ‘मच्छीमार सेल'ची जी जबाबदारी सोपविली आहे, ती जबाबदारी तेवढ्याच विश्वासाने आणि ताकदीने पार पाडणार असल्याची ग्वाही चंदू पाटील यांनी दिली. त्याअनुषंगाने राज्यभर दौरे करुन सभा, बैठका घेऊन जनजागृती करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.


सदर बैठकीत ‘मच्छीमार सेल'च्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील समस्यांचा पाढा वाचत कोळी बांधवांबद्दलच्या शासनाच्या उदासीन धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना जशी ओला दुष्काळ, सुका दुष्काळ जाहीर करुन भरपाई दिली जाते त्याच धर्तीवर कोळी बांधवांसाठीही भरपाई मिळावी, अशी मागणी यावेळी ‘मच्छीमार सेल'चे उपाध्यक्ष विजय वरळीकर यांनी केली. तर पनवेल, रायगड जिल्ह्यात कोळी बांधवांवर प्रत्येक ठिकाणी अन्याय होत आहे. त्यांना सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी कार्यकारणीने प्रयत्न करावेत, असे मंगेश कोळी यांनी सांगितले.

बैठकीच्या शेवटी चंदू पाटील यांनी सध्या अस्तित्वात असलेली ‘मच्छीमार सेल'ची राज्य कार्यकारिणी बरखास्त केली. तसेच लवकरच नवीन कार्यकारणी निवडण्यात येणार असल्याचे सागितले. याप्रसंगी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पराडकर, उपाध्यक्ष विजय वरळीकर, डॉ. रुपेश कोळी, मनोहर ठाकूर, देवेंद्र कोळी, सचिव प्रकाश वैती, नंदिनी भोईर, मुंबई विभाग अध्यक्ष प्रदीप टपके, नवी मुंबई अध्यक्ष राहुल म्हात्रे, रायगड जिल्हा अध्यक्ष मंगेश कोळी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर काटकर, पालघर जिल्हा अध्यक्ष संगीता फाटक, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष अरुण परदेशी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आयकॉनिक महापालिका मुख्यालय वास्तुला निळी झळाळी