कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी मोहिम सुरू

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत नाव नोंदविण्याची संधी

ठाणे - कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी मोहिम सुरू आहे. आतापर्यंत मतदार नोंदणी न केलेल्या माध्यमिक शिक्षकांनी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत अर्ज क्र. 19 भरून नाव नोंदणी करावी. यासाठी माध्यमिक शाळेच्या प्राचार्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी आज केले.

शिक्षक मतदार नोंदणीसंदर्भात आज जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जास्तीत जास्त शिक्षकांनी मतदार व्हावे, यासाठी मुख्याध्यापक/प्राचार्यांनी शिक्षकांकडून अर्ज भरून संबंधित मतदार नोंदणी कार्यालयाकडे पाठवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 साठी मतदार नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्यानुसार 1 ऑक्टोंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत नोंदणी प्रक्रिया पार पडली. दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तर 30 डिसेंबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, मात्र, अद्यापही ज्यांना मतदार म्हणून अर्ज करायचे आहे, त्यांनी अर्ज नमुना क्र. 19 भरून दि. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत अर्ज करावे.

शिक्षक मतदारसंघासाठी मतदार म्हणून जिल्ह्यात वास्तव्य असलेले माध्यमिक शाळांमधील शिक्षक पात्र असून 1 नोव्हेंबर 2022 या दिनांकापूर्वी मागील सहा वर्षांपैकी तीन वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून काम करणारे, जिल्ह्यात रहिवास असलेले, तसेच मागील तीन वर्षात निवृत्त झालेल्या शिक्षकांना मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे.

          ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये, तहसीलदार कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण भवनमधील सहायक पुरवठा अधिकारी कार्यालय आदी 14 ठिकाणी मतदार यादीतील नाव नोंदणी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-19.pdf या संकेतस्थळावरही अर्ज मिळेल.

जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या जास्तीत जास्त पात्र शिक्षकांची मतदार यादीत नाव नोंदणी व्हावी, यासाठी शाळा/महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देणार -चंदू पाटील