मच्छीमारांना शेवंडी आणि खेकड्यांचा आधार

उरण  :  उरण तालुक्यातील  मच्छीमारांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असून त्याच वेळी मच्छीमारांना शेवंडी व खेकड्यांचा आधार मिळू लागला आहे. मागील वर्षापेक्षा या वेळी शेवंडीचा दर किलोमागे ६०० रुपयांनी वाढला आहे. पूर्वी शेवंडीचा दर किलोला १२०० रुपये होता तो वाढून प्रतिकिलो १ हजार ८०० रुपयांवर गेला आहे. याचा फायदा मच्छीमारांना होत असून अनेकांना आधारही होत आहे.

करोना काळ आणि एका वर्षात समुद्रात आलेली एकामागून एक अशी पाच चक्रीवादळे यामुळे मच्छीमार व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यातच २०१८ पासून मच्छीमारांना शासनाकडून दिले जाणारे डिझेल वरील लाखो रुपयांचे परतावेही रखडले आहेत. त्यामुळे मच्छीमार आणखीच आर्थिक संकटात सापडला आहे. यामधून दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सध्या मच्छीमार समुद्रात जाऊन शेवंड्या पकडत आहेत. या शेवंडीची खरेदी करंजा बंदरावर केली जात आहे. उत्तम व मोठ्या शेवंडीचा सध्याचा दर हा १ हजार ८०० रुपये आहे. त्यामुळे स्थानिक व छोट्या मच्छीमारांना याचा फायदा होत आहे. यातील अनेक मच्छीमार दोन ते तीन किलो शेवंड्या पकडत आहेत.

करंजामधील शेवंडी परदेशात  पाठविली जाते. शेवंडी हा प्रकार कोळंबीसारखा प्रकार असतो. त्याला परदेशी खूप  मागणी असते  त्यात सिंगापूर, हाँगकाँगसारख्या तसेच देशातील पंचतारांकित हॉटेलांकडूनही मोठी मागणी आहे. त्यामुळे करंजामधील मच्छीमारांनी पकडलेल्या शेवंड्या या देशी-विदेशी पंचतारांकित हॉटेलमधील खवय्यांची मेजवानी ठरत आहे.

केगाव -दांडा समुद्रात शेवंडी, खेकडे नेहमीच मिळत असतात उत्तम व मोठ्या शेवंडीचा सध्याचा दर हा १ हजार ८०० रुपये आहे. त्यामुळे स्थानिक व छोट्या मच्छीमारांना याचा फायदा होत आहे असे केगाव ग्रामपंचायत हद्दीतील आवेडा  येथील दीपक पाटील यांनी सांगितले. 

Read Previous

१३ ते १६मे दरम्यान वाशीत होणार क्रेडाई-बीएएनएम यांच्या २०व्या मेघा प्रॉपटी प्रदर्शन