देवगड पाठोपाठ आता अलिबाग हापूस आंबा एपीएमसी बाजारात दाखल
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात २७ जानेवारी रोजी कोकणातील देवगड हापूस आंब्याची २४ पेट्यांची पहिली खेप दाखल झाल्यानंतर आता ५ फेब्रुवारी रोजी अलिबाग मधील हापूस आंबा दाखल झाला आहे. अलिबाग हापूस आंबा पेटीला पाच हजार रुपये दर मिळाला आहे.
फळांचा राजा म्हणून हापूस आंब्याची ओळख आहे. हिवाळा संपताच खवय्यांना हापूस आंब्याच्या गोडीची चाहूल लागते. हापूस आंब्याचा खरा हंगाम मार्च महिन्यात जरी सुरु होत असला तरी काही प्रमाणात हंगाम पूर्व हापूस आंबा वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात दाखल होतो. यंदा २७ जानेवारी रोजी एपीएमसी फळ बाजारात २४ पेट्या आवक होऊन देवगड हापूस आंबा हंगामाला सुरुवात झाली होती. त्यात आता आवक वाढून देवगड हापूस आंबा पेट्यांची संख्या १७० ते १८० इतकी झाली आहे. देवगड पाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील हापूस आंब्याने हंगामाचा मुहूर्त साधला आहे. वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी गावातील आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी केशर जातीच्या हापूस आंब्याची पेटी पाठवली आहे. त्यामुळे हापूस आंब्याचा मुहूर्त साधणारे वरुण पाटील, रायगड जिल्ह्यातील पहिले आंबा बागायतदार शेतकरी ठरले आहेत. अलिबाग हापूस आंबा पेटीला ५ हजार रुपये दर मिळाला आहे.
दरम्यान, रायगड मधील हापूस आंबा जरी आता एपीएमसी फळ बाजारात दाखल झाला असला तरी हापूस आंब्याचा मुख्य हंगाम येत्या एप्रिल मध्ये सुरु झाल्यानंतर हापूस आंबा दर खाली उतरतील, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील आंबा व्यापाऱ्यांनी दिली.