महापालिका आयुवतांकडून सायन्स पार्क प्रकल्पाची पाहणी

सायन्स पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचा, नाविन्यपूर्ण होण्याची कार्यवाही करा -राजेश नार्वेकर


नवी मुंबई ः नवी मुंबई शहराच्या वैशिष्ट्यांमध्ये विशेष भर घालणारा सायन्स पार्कसारखा अभिनव प्रकल्प वंडर्स पार्क परिसरात उभारला जात आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर कामाची पाहणी करत अशा स्वरुपाच्या देशापरदेशातील प्रकल्पांपेक्षा सायन्स पार्क प्रकल्प वेगळा व्हावा यादृष्टीने नियोजन कराव, असे निर्देश शहर अभियंता सजंय देसाई आणि अभियांत्रिकी विभागाला दिले.

सद्यस्थितीत सायन्स पार्कमधील तळमजल्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून पहिल्या मजल्याचे काम सुरु आहे. या कामांची पाहणी करताना कामाला अधिक वेग देत विहित वेळेत काम पूर्ण होईल या प्रकारे नियोजन करावे. त्याकरिता आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढ करुन कामाला गती द्यावी, असेही आयुक्त नार्वेकर यांनी निर्देशित केले.
सायन्स पार्कमध्ये प्रदर्शित करावयाच्या विविध बाबींची उपलब्धता कशा पध्दतीने करता येईल याबाबतची कार्यवाही आत्ताच सुरु करावी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल लक्षात घेऊन त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्याचे नवीन आणि अत्याधुनिक असलेले प्रकल्प या सायन्स पार्कमध्ये लोकांना बघता येतील अशाप्रकारे सायन्स पार्क आगळावेगळा होण्याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निर्देशित केले. शक्यतो इतर पार्कमध्ये बघता येत नाहीत अशाप्रकारचे नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प आपल्या पार्कमध्ये बघता येतील अशी व्यवस्था करण्याच्या सुचनाही आयुक्त नार्वेकर यांनी दिल्या.

वंडर्स पार्क मधील १९५०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या बांधकाम क्षेत्रात सायन्स पार्क सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प नवी मुंबई महापालिकेच्या वतीने उभारला जात असून यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत मॉडेल्स, थ्री डी इमेजेस, प्रकल्प, ऑडियो व्हिज्युअल फिल्म्स अशा विविध माध्यमांतून विज्ञानाचे महत्व सहज साध्या पध्दतीने प्रसारीत केले जाणार आहे.

दरम्यान, नवी मुंबई स्वच्छ आणि सुंदर शहराचा सातत्याने बहुमान मिळविणारे शहर असल्याने नवी मुंबईतील प्रत्येक गोष्टीकडे ती उत्तमच दर्जाची असावी या अपेक्षेने संपूर्ण देशातील नागरिक बघत असतात. त्यामुळे वंडर्स पार्कच्या परिसरातील सायन्स पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचा होण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घ्यावी. सायन्स पार्कमध्ये समाविष्ट प्रत्येक गोष्ट नाविन्यपूर्ण आणि इतरांपेक्षा वेगळी असेल याची दक्षता घ्यावी, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पाहणी दौऱ्याप्रसंगी नमूद केले.

मोठ्यांप्रमाणेच विशेषत्वाने लहान मुलांच्या दृष्टीने विज्ञान पार्क माहिती आणि ज्ञानाचा खजिना खुला करुन देणारा असेल. त्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शाळांच्या सहली येतील, अशी बाब लक्षात घेऊन शाळांच्या बसेसची पुरेशी पार्किंग व्यवस्था ठेवावी. महत्वाचे म्हणजे सायन्स पार्क पाहण्यासाठी केवळ आपल्या आसपासच्या परिसरातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून, देशाच्या विविध प्रांतातून, एवढेच नव्हे तर अगदी परदेशातूनही पर्यटक एक आकर्षण केंद्र म्हणून या पार्कला भेटी देणार आहेत. त्यामुळे पार्कच्या सभोवतालचा परिसरही तशा दर्जाचा ठेवावा. त्यादृष्टीने शेजारच्या वंडर्स पार्कमध्येही आवश्यक सुधारणा कराव्यात. -राजेश नार्वेकर, आयुक्त -नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जिल्ह्यातील नद्या पुनरुज्जीवत करण्यासाठी रोड मॅपचे सादरीकरण करावे