जिल्ह्यातील नद्या पुनरुज्जीवत करण्यासाठी रोड मॅपचे सादरीकरण करावे

चला जाणूया नदीला' अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे निर्देश

ठाणे ः जिल्ह्यातील नद्या वाहत्या राहण्यासाठी तसेच प्रदुषण विरहित करण्यासाठी काय काय उपाय योजना करता येईल यासंदर्भात ‘चला जाणूया नदीला' अभियान अंतर्गत रोड मॅप तयार करावा. तसेच सर्व विभागांनी यासंदर्भात पुढील बैठकीत कृती आराखड्याचे सादरीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला' या अभियानाची जिल्हास्तरीय पहिली बैठक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. याप्रसंगी ‘समिती'चे सहअध्यक्ष तथा ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपवनसंरक्षक तथा समिती सदस्य सचिव संतोष सस्ते, सदस्य उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई, ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे डी.एम. कोकाटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छाया सिसोदे, ‘अभियान'च्या समन्वयक स्नेहल दोंदे, ‘वसुंधरा मंडळ'चे संस्थापक अनंत भागवत यांच्यासह नदी पुनरुज्जीवन क्षेत्रात काम करणारे विविध सदस्य उपस्थित होते.

‘चला जाणूया नदीला' अभियान मध्ये जिल्ह्यातील भातसा, उल्हास, वालधुनी, कुंभेरी, कामवारी, भारंगी, कनकवीरा, चोर नदी, लेणाड नदी या नद्यांचा समावेश आहे. या नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच त्या वाहत्या करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याची गरज आहे. तसेच शास्त्रीय दृष्टिकोनातून काय करता येईल याबाबतही विचार करावा. नद्यांच्या पूररेषा निश्चित करण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी. संबंधित पुररेषातील अतिक्रमणे हटविण्यासाठी कायदेशीर उपाय योजावे लागतील. नद्यांच्या किनाऱ्यावरील उद्योगांकडून होणारे दुषित सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आणि दुषित पाण्याचे स्त्रोत बंद करण्यासाठी कडक उपाय योजावेत, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी स्नेहल दोंदे यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या संदर्भातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले. तसेच अभियानात कशाप्रकारे काम अपेक्षित आहे याची माहिती दिली. नदी स्वच्छतेतून गावाचा विकास करण्याचे ध्येय ठेवून अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर भागवत यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काय करता येईल याबद्दल माहिती दिली.

नद्यांच्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देता येईल का यासंदर्भात नियोजन करावे. पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्यासाठीही वेगवेगळे उपक्रम राबविण्यात यावेत. प्रदुषणासंबंधी गावातील नागरिकांचे विशेषतः महिलांची जनजागृती करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. -अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी-ठाणे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील रायगड जिल्हा प्राथमिक फेरीला सुरुवात