जन्मापासूनच हृदयविकार असलेल्या 11 लहान मुलांवर 11 तासांत मॅरेथॉन शस्त्रक्रिया  

जन्मापासूनच हृदयविकार असलेल्या 11 लहान मुलांवर हृदयाच्या शस्त्रक्रिया 11 तासांत यशस्वीरित्या  पार

नवी मुंबई : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने जन्मापासूनच हृदयविकार असलेल्या वाशिम जिह्यातील 11 लहान मुलांवर हृदयाच्या शस्त्रक्रिया 11 तासांत यशस्वीरित्या  पार पाडल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) योजनेअंतर्गत अपोलो हॉस्पीटल्सच्या वतीने या सर्व शस्रक्रीया करण्यात आल्या आहेत. या रोगावर उपचार केला नसता तर या मुलांना कुपोषण आणि दीर्घकालीन गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका होता.  

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) योजनेअंतर्गत देखील रुग्णांना उपचार प्रदान करते. आरबीएसके योजनेअंतर्गत जिल्हा वैद्यकीय अधिकारी जन्मजात हृदयविकार असलेल्या लहान मुलांना हेरुन त्यांची तपासणी  केली जाते. त्यांचे तज्ञ डॉक्टरांकडुन निदान करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर आरबीएसके योजनेअंतर्गत उपचार केले जातात. गत सफ्टेंबरमध्ये अपोलो हॉस्पीटलमधील डॉक्टरच्या टीमने वाशिम जिह्यातील सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली होती. त्यावेळी जन्मजात हृदयविकार असल्याचा संशय असलेल्या 120 मुलांची इकोकार्डिओग्राफी करण्यात आली. या तपासणीत 120 मुलांपैकी 35 मुलांना जन्मजात हृदयविकार असल्याचे आढळुन आले.  

त्यातील 4 ते 13 वर्षे वयोगटातील 35 पैकी 40 टक्के मुलांवर अँजिओग्राफीद्वारे उपचार करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या परवानगीने सदर मुलांना अँजिओग्राफी डिव्हाइस क्लोजरच्या प्रक्रियेसाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये आणण्यात आले. या प्रक्रियेच्या दिवशी सकाळी 7.30 वाजता डॉक्टरांनी शस्त्रक्रियेला सुरुवात केली. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशाप्रकारे शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्याची माहिती अपोलो हॉस्पिटल्स मधील पॅडिएट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ.भुषण चव्हाण यांनी दिली.  

यातील 11 पैकी 5 मुलांना पेरी-मेम्ब्रेनस व्हॅस्क्युलर रोग झाला होता. मुलांना शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिस-या दिवशी रुग्णालयातून सोडण्यात आले. या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. तसेच संपूर्ण शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्या. आता या मुलांना पहिल्या महिन्याच्या अखेरीस आणि 6 महिन्यांनंतर तपासणीसाठी भेट द्यावी लागणार आहे. उर्वरित मुलांवर देखील नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे उपचार केले जाणार असल्याचे अपोलो हॉस्पिटलचे प्रादेशिक सीईओ संतोष मराठे यांनी सांगितले.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान'मध्ये आरोग्य विभागाची सर्वोत्तम कामगिरी