गोवर प्रतिबंधक उपाययोजनांसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन

गोवर झालेल्या बालकांसाठी मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय येथे विशेष विलगीकरण कक्ष

नवी मुंबई ः आसपासच्या शहरांमधील गोवरबाधीत मुलांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका सतर्क झाली असून आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत नागरी आरोग्य केंद्रनिहाय विशेष सर्व्हेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

गोवर टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून महापालिकेने सातत्याने लसीकरण सुरु ठेवल्याने एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ९ ते १२ महिने पर्यंतच्या १४२१५ बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला डोस दिलेला आहे. महापालिकेला दिलेल्या १३४२३ इतक्या पहिल्या डोसच्या उद्दिष्टापेक्षा जास्त बालकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे १६ ते २४ महिने वयोगटातील १३१७२ बालकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील गोवर बाधीतांचे प्रमाण काहीसे मर्यादित आहे.


तरीही इतर शहरांमधील स्थिती लक्षात घेता नवी मुंबई महापालिका दक्ष झाली असून महापालिका कार्यक्षेत्रात संशयित गोवर रुग्ण शोधण्यासाठी नागरी आरोग्य केंद्रनिहाय ३० नोव्हेंबर पर्यंत विशेष सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील ० ते ५ वर्षे वयोगटातील लस घेण्याचे राहून गेलेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी १७५ अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नेरुळ मधील महापालिकेच्या मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय येथे तळमजल्यावर ८ रुग्णखाटांचा विशेष विलगीकरण कक्ष गोवर झालेल्या बालकांसाठी स्थापित करण्यात आलेला आहे.


याबाबत महापालिका क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांचे विशेष प्रशिक्षण जागितक आरोग्य संघटनेचे विशेष समन्वयक डॉ. अरुण काटकर यांनी उजळणी प्रशिक्षण घेतले आहे. अशाच प्रकारे महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच बालरोगतज्ञ, स्टाफ नर्स, एल.एच.व्ही., ए.एन.एम. यांचेही उजळणी प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.


प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस मोफत उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. बालकांचे गोवर, रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.


गोवर विषाणूपासून होणारा साथीचा आजार असून विषाणुने शरीरात प्रवेश केल्यानंतर ७ ते १० दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. लक्षणांमध्ये सुरुवातीला ताप आणि खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक, दोन किंवा तीनही लक्षणे दिसतात. सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर २ ते ४ दिवसांनी अंगावर पुरळ दिसू लागते. पुरळ कानाच्या मागे सुरु होऊन नंतर चेहरा, छाती, पोट आणि पाठ या ठिकाणी पसरते. गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ-जीवनसत्वाचे प्रमाण कमी होऊन त्यामुळे रुग्णाला डोळयांचे आजार आणि अतिसार, न्युमोनिया, मेंदूज्वर असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ-जीवनसत्वाची मात्रा दिल्यास  आजार होण्याची शक्यता कमी असते.

गोवरचा विषाणू रुग्णांच्या खोकल्यातून किंवा शिंकेद्वारे हवेमार्फत पसरतो आणि संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता नजिकच्या महापालिका रुग्णालयास किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावी. तसेच गोवरचा उद्रेक टाळण्यासाठी ज्या ५ वर्षापर्यंतच्या बालकांना डोस घेता आला नाही अशा बालकांसाठी घरांना भेटी देणाऱ्या स्वयंसेवकांना आपल्या बालकांबाबत योग्य माहिती देऊन गोवर लस घेण्याबाबत संपूर्ण सहकार्य करावे.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जन्मापासूनच हृदयविकार असलेल्या 11 लहान मुलांवर 11 तासांत मॅरेथॉन शस्त्रक्रिया