रुग्णांना महापालिकामार्फतच औषधे उपलब्ध करुन देण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांचे निर्देश

नवी मुंबई ः आरोग्य सेवा नागरिकांशी संबंधित अत्यंत महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिकेच्या नेरुळ आणि वाशी सार्वजनिक रुग्णालयांना अचानक भेट देऊन तेथील सुविधांबाबय आवश्यक सुधारणांविषयी तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, विद्युत कार्यकारी अभियंता सुनिल लाड, संबंधित अधिकारी तसेच वाशी सार्वजनिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे, नेरुळ सार्वजनिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उध्दव खिल्लारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.  

कोव्हीड प्रभावीत काळात आरोग्य सेवांमध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये घेण्यात आलेल्या उपकरणांचा फायदा यापुढील काळात सर्वसाधारण रुग्णसेवेकरिता करुन घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी दोन्ही रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांंना दिले.

औषधे तसेच सर्र्जकिल साहित्य याबाबतच्या कमतरतेविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सखोल पाहणी करत औषधांविषयीच्या तक्रारी मुख्यालय स्तरावरून तसेच रुग्णालय स्तरावरुन तातडीने दूर होतील व रुग्णांना औषधे उपलब्ध होतील याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. महापालिका रुग्णालयात दाखल झालेल्या कोणत्याही रुग्णाला औषधासाठी प्रिस्क्रिप्शन दिली जाऊ नये या महापालिकेच्या धोरणाचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही अशाप्रकारे कार्यवाही करावी. रुग्णांना महापालिकेमार्फतच औषधे उपलब्ध करुन दिली जातील, याची काटेकोर दखल घ्यावी. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले.


वाशी सार्वजनिक रुग्णालयाचे बांधकाम होऊन २४ वर्षाहून अधिक काळ होऊन गेला असल्याने त्याठिकाणी स्थापत्य व विद्युत विषयक कामे करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रुग्णसेवेला अडथळा न येता त्याठिकाणी आवश्यक कामे नियोजनबध्दरित्या करावीत. तेथील अधिकारी-कर्मचारी तसेच उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या बैठक व्यवस्थेच्या जागांचेही पुनर्नियोजन करुन सुव्यवस्थित आखणी करावी. महापालिका रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने त्यांना बाह्य रुग्णसेवेसाठी घ्यावा लागणारा केसपेपर तसेच डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर औषधे घेण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने दररोजची रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुनर्नियोजन करावे. त्याचप्रमाणे टोकन सिस्टीम सुरु केल्यास आणि बसण्याची पुरेशी व्यवस्था केल्यास रुग्णांना सोयीचे होईल. त्यादृष्टीनेही जागेची उपलब्धता पाहून कार्यवाही करावी. या भेटीवेळी आयुवत नार्वेकर यांनी काही रुग्ण आणि नातेवाईकांशी थेट संवाद साधत त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

नेरुळ रुग्णालयातील आरटी-पीसीआर लॅब मार्फत कोव्हीड काळात अतिशय उल्लेखनीय काम झालेले असून सद्यस्थितीत २ पैकी १ लॅब पूर्ण क्षमतेने सुरु आहे. याच धर्तीवर दुसरीही लॅब नियमित कराव्या लागणाऱ्या विविध चाचण्यांसाठी संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. त्याचप्रमाणे महापालिकेचा स्वतःचा मायक्रोबायलॉजी विभाग सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु करावा. नेरुळ आणि वाशी रुग्णालयात पदव्युत्तर पदवी मेडीकल कॉलेज सुरु करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही सुरु असून पीजी इन्स्टिट्युट अंतर्गत निर्माण केल्या जाणाऱ्या केंद्रीय लायब्ररीच्या कामाची पाहणी करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी एक आठवड्यात काम पूर्ण करण्यात यावे. इन्स्टिट्युचे काम नियोजनबध्दरित्या करुन विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निश्चित आराखड्यानुसार अंमलबजावणी करावी, अशाही सूचना आयुक्त नार्वेकर यांनी दिल्या आहेत.

महापालिकेच्या रुग्णसेवेवर बहुतांशी नागरिक अवलंबून असतात. उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे महापालिकेची जबाबदारी आहे. त्यातही नवी मुंबई सारख्या आधुनिक शहरातील महापालिकेकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा असतात. महापालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी असते. त्यामुळे आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या सेवेप्रती तत्पर राहून काम करावे. या माध्यमातून नागरिकांना समाधानकारक आरोग्य सेवा द्यावी.  कर्मचाऱ्यांची कमतरता भरुन काढण्याच्या दृष्टीने कोव्हीड काळात घेतलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात यावा. त्याचप्रमाणे समारंतररित्या नियमित भरतीच्या प्रक्रियाही सुरु करावी.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुल्जर पंप्स कंपनीतर्फे ७०० गवंडी कामगारांना  बॅग आणि टूलकिट वाटप