जलतरणातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल

नवी मुंबई ः नवी मुंबईकर नागरिक असलेला शिवछत्रपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपट्टू शुभम धनंजय वनमाळी याला भारत सरकारच्या युवा कार्यक्रम-खेल मंत्रालयातर्फे दिला जाणारा साहसी क्रीडा प्रकारातील सर्वोच्च अशा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आला आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनमधील दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  

शुभम वनमाळी याने आजतागायत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण मोहीम पार पाडून अनेक विक्रम आपल्या नावे केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, कॅटालिना खाडी, मॅनहॅटन मॅरेथॉन स्विम, गेट वे ऑफ इंडिया ते धरतमतर, गेट वे ऑफ इंडिया ते डहाणू बीच अशा अनेक सागरी मोहिमा पोहून फत्ते केलेल्या आहेत. त्याचबरोबर ग्रँड डब्लिन स्विम, आयरिश नॅशनल स्विम या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.  

शुभम वनमाळी याने आजपर्यंत केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारच्या युवा कार्यक्रम-खेल मंत्रालयाने त्याला तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार जाहिर केला आहे.

दरम्यान, सदर पुरस्कार सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मिळाल्यामुळे याचा आनंद काही वेगळाच आहे, अशा भावना शुभमचे वडील धनंजय वनमाळी आणि आई दिपिका वनमाळी यांनी व्यक्त केल्या आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रुग्णांना महापालिकामार्फतच औषधे उपलब्ध करुन देण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांचे निर्देश