खंडणीसाठी तळोजा भागातील ऑईल विक्री व्यवसायीकासह त्याचा मुलगा व भावावर प्राणघातक हल्ला

नवी मुंबई : अंबरनाथ नेवाळी येथील गुड्डू उर्फ मुस्ताक अब्दुल मारुफ खान (28) या सराईत गुंडाने व त्याच्या तिघा साथीदारांनी 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी तळोजा भागातील ऑईल विक्री व्यवसायीकासह त्याचा मुलगा व भावावर तलवार, गुप्ती व टॉमीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात ऑईल व्यवसायीकासह तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी गुड्डुसह चौघांविरोधात खंडणी आर्म ऍक्टसह प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

या प्रकरणातील तक्रारदार अब्दुल आवल नबीरहिम चौधरी (46) हे खारघर मधील ओवे गावात कुटुंबासह राहण्यास असून त्यांचा तळोजा धानसर गाव येथे ऑईल विक्रीचा व्यवसाय आहे. ऑईल व्यवसायीक चौधरी यांना अंबरनाथ नेवाळी येथील सराईत गुंड गुड्डु उर्फ मुस्ताक अब्दुल मारुफ खान याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्याच्याकडून तो प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये हफ्ता घेऊन जात होता. मात्र गत शनिवारी दुपारी गुड्डु उर्फ मुस्ताक खान हा आपल्या तीन सहकाऱयांसह चौधरी यांच्या गोडाऊनवर गेला होता. त्यानंतर त्याने या महिन्यापासून 50 हजार रुपये हप्ता देण्यास चौधरीला बजावले. अन्यथा त्याला धंदा करु देणार नसल्याचे धमकावले.  

या प्रकारामुळे घाबरलेल्या चौधरीने मुलगा बिलाल व मानलेला भाऊ नरेंद्र सिंग या दोघांना फोन करुन बोलावुन घेतल्यानंतर गुड्डु व त्याच्या साथिदारांनी चौधरी यांना धक्काबुक्की करत त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची खंडणी तत्काळ देण्याची मागणी सुरु केली. त्यामुळे चौधरीचा मुलगा बिलाल व नरेंद्रसिंग हे दोघे त्यांना सोडविण्यास पुढे गेले असता, आरोपी गुड्डु याच्या सहकाऱयांनी त्यांच्या स्कोडा गाडीतुन तलवार, गुप्ती, टॉमी अशी हत्यारे आणली. त्यानंतर गुड्डुने नरेंद्र सिंग याच्या डोक्यात तलवार मारुन त्याला जखमी केले. तर त्याच्या सहकाऱयांनी चौधरी व बिलाल या दोघांना धमकावुन त्यांच्यावर देखील गुप्ती व इतर हत्याराने हल्ला केला.  

या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर गुड्डु व त्याच्या सहकाऱयांनी 50 हजाराच्या खंडणीसाठी त्यांना धमकावुन त्याठिकाणावरुन पलायन केले. त्यानंतर येथील लोकांनी तिघा जखमींना तळोजा एमआयडीसीतील साई हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यानंतर तळोजा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन चौधरी यांचा जबाब नोंदवून घेत गुंड गुड्डु उर्फ मुस्ताक खान व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जेएनपीटी ट्रस्टी विश्वस्त पदाच्या दोन जागांसाठीची निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न