केंद्र शासनाने शेतकरी, व्यापारी आणि अडते यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरे आयोजित

वाशी ः ई-नाम कार्यप्रणाली बाबत केंद्र शासनाने शेतकरी, व्यापारी आणि अडते यांच्यासाठी माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये  ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र कृषि पणन मंडळ, पुणे यांनी उद्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) करीता ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून, या शिबिरात एपीएमसी मधील शेतकरी, व्यापारी, अडते यांनी सहभाग घेण्याचे आवाहन एपीएमसी प्रशासन मार्फत करण्यात आले आहे.

देशातील शेतकऱ्याला शेतमालाचा योग्य भाव (स्पर्धात्मक दर) मिळावा आणि खरेदीदाराला चांगल्या प्रतीचा शेतमाल उपलब्ध होण्यासाठी कृषीमालाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार संगणकावर आधारित व्हावा, यासाठी राष्ट्रीय कृषी प्रणाली अर्थात ई-नाम (ऑनलाइन ट्रेडिंग) कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने सहा वर्षापूर्वी एक ऍप विकसित केले. या ऍप मार्फत ई-नाम प्रणाली राबविण्याचे आदेश केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘ई-नाम'चे कामकाज सुरु आहे. मात्र, प्रशिक्षण अभावी ई-नाम द्वारे अजूनही हवा तसा व्यापार होत नाही. त्यामुळे बाजार समितीतील शेतकरी, अडते यांना प्रशिक्षण देण्याबाबत केंद्र शासनाने सूचित केले आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र कृषि पणन मंडळ, पुणे यांनी बाजार आवारातील शेतकरी, व्यापारी आणि अडते यांच्याकरिता संपुर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन प्रशिक्षण सुरु केलेले आहे. वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती करिता ऑनलाईन प्रशिक्षण उद्या १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत आयोजित केले आहे. त्यामुळे बाजार आवारातील सर्व संघटनेचे सभासद अडते, शेतकरी, व्यापारी यांनी सदर प्रशिक्षणाकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन एपीएमसी प्रशासनाने केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एकाच वेळी नातेसंबधांतील आगरी समाजाचे सात-आठ लग्न एकाच ठिकाणी