नवी मुंबई शहरात लवकरच हवा शुध्दीकरण केंद्रे

वाशी ः मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता मुंबई शहरापेक्षाही खालावत चालली आहे. या खराब हवेत धुळीचे प्रमाण अधिक असल्याने भविष्यात श्वसन विकार आजारात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे नवी मुंबई मधील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. यावर उपाय म्हणून नवी मुंबई महापालिका प्रशासन नवी मुंबई शहरात हवा शुध्दीकरण केंद्र बसवण्याच्या तयारीत आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई शहरातील हवा अति खराब असून, हवा गुणवत्ता निर्देशांक ३१९वर पोहोचला आहे. नवी मुंबईतील पीएम २.५ सांद्रता सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या हवेच्या गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्त्वापेक्षा १२.८ पट जास्त असल्याचे केलेल्या निर्देशांक मूल्यातून स्पष्ट होत आहे. नॅशनल एक्यूआय-सीपीसीबी यांच्या अहवालानुसार मागील आठवडाभरापासून नवी मुंबई शहरातील हवा अति खराब यादीत समाविष्ट होत असून, यात नेरुळ मधील हवा गुणवत्ता निर्देशांक ३१९वर गेला आहे. अहवालात हवा गुणवत्ता स्थिती अधिक प्रदूषित नोंदवण्यात आलेली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील हवा प्रदूषित होत चालल्याने शहरवासीयांच्या चिंतेत भर पडत चालली आहे.

महापालिका हद्दी शेजारी सध्या नवी मुंबई विमानतळ कामासाठी मोठे खोदकाम सुरु आहे. तसेच नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पुनर्विकास, रस्त्यावरील धूळ आणि रासायनिक कारखान्यांमधून सोडण्यात येणारे प्रदूषित वायू, या सर्वांमुळे नवी मुंबई शहरातील हवा प्रदूषित होत चालली आहे. त्यामुळे प्रदूषित हवेचे सातत्य असेच राहिले तर लवकरच नवी मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होऊन श्वसन निगडित व्याधीनी नवी मुंबईकर ग्रासले जातील, अशी शवयता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. वाढत्या प्रदूषणावर नवी मुंबई महापालिका पर्यावरण विभागाने देखील चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी दिवसात नवी मुंबई शहरातील वायू विशेषतः धुळीचे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहरात हवा शुध्दीकरण केंद्र बसवण्याच्या तयारीत महापालिका आहे. त्यासाठी पर्यावरण विभागामार्फत गुडगाव येथील हवा शुध्दीकरण केंद्रांची तपासणी करुन त्या धर्तीवर हवा शुध्दीकरण केंद्र नवी मुंबई शहरात बसवण्यात येणार आहेत. हवा शुध्दीकरण केंद्र एक किलोमीटर परीघ क्षेत्रातील हवा शुध्द करते. त्यामुळे प्राथमिक स्तरावर अशुध्द हवेचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी हवा शुध्दीकरण केंद्र बसवण्यात येणार आहेत.

मागील काही दिवसांपाून नवी मुंबई शहरात अति खराब हवेची नोंद होत असून, यात धुळीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील हवा शुध्द ठेवण्यासाठी गुडगाव शहराच्या धर्तीवर हवा शुध्दीकरण केंद्र बसवण्याच्या तयारीत महापालिका आहे. मात्र, गुडगाव येथील हवा शुध्दीकरण केंद्रांची किंमत अधिक असल्याने इतर पर्यायाच्या शोधात महापालिका असून, लवकरच हवा शुध्दीकरण केंद्र नवी मुंबई शहरात बसवले जाणार आहेत. - शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत आणि पर्यावरण विभाग) - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केंद्र शासनाने शेतकरी, व्यापारी आणि अडते यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरे आयोजित