बाल महोत्सवात सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे स्वच्छतेचा जागर
नवी मुंबई ः स्वच्छता विषयक कोणत्याही उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थी अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात. त्यामुळे देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराच्या लाभलेल्या बहुमानात नवी मुंबईतील मुलांचाही अतिशय महत्वाचा वाटा आहे. मुले दिशादर्शक असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून घराघरात कचरा वर्गीकरणाचा आणि स्वच्छतेचा संदेश पोहोचेल. हीच मुले स्वच्छतादूत बनून पालकांकडून ते वर्गीकरण करुन घेतील आणि या माध्यमातून देशात पहिल्या नंबरच्या स्वच्छ शहराचे आपले ध्येय आपण साध्य करु शकू, असा विश्वास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या स्वच्छ बाल महोत्सव प्रसंगी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुस्कर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त मंगला माळवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
झाडू, खराटा, कचरा डबा, हातमोजे अशा स्वच्छताविषयक साहित्याचा वापर करुन करावयाच्या नृत्य स्पर्धेतील ३६ सहभागी स्पर्धकांतून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ५ शाळा समुहांचे नृत्य सादरीकरण याप्रसंगी झाले. यामधून सुशिलादेवी देशमुख मराठी विद्यालय-ऐरोली या शाळेने सर्वप्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. विद्याभवन प्राथमिक शाळा-नेरुळ द्वितीय तसेच महापालिका शाळा क्र.१११ तुर्भे स्टोअर तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. शाळा क्र.४६, गोठिवली आणि शाळा क्र.२२ तुर्भे या शाळांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.
बालमहोत्सवात सादर झालेल्या मनिष गजभर या महापालिका शाळा क्र. ९२ कुकशेत येथील विद्यार्थ्याने आपल्या विद्यार्थी सहकाऱ्यांसह सादर केलेले कीर्तन अत्यंत लक्षवेधी ठरले. स्वच्छता संदेशाचे अभंग, रचनांतून अत्यंत प्रभावी सादरीकरण करणाऱ्या कीर्तनकार विद्यार्थ्याचा आयुक्त नार्वेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
नाट्यमय आणि ज्ञानसाधना परिवार या कलासंस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेले मूकनाट्य तसेच ओलू सुकू घातकू या पथनाट्याला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक विभागाच्या चित्रकला आणि माध्यमिक विभागाच्या निबंध स्पर्धेची तसेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेची पारितोषिके वितरीत करण्यात आला.
पहिला नंबर विद्यार्थ्यांना अभिमानाचा आणि हवाहवासा वाटतो. त्यामुळे आपल्या शहराच्या देशातील नंबर वन यशासाठी यापुढील काळात प्रत्येक विद्यार्थ्याने आपला वर्ग, शाळा तसेच आपले घर, परिसर स्वच्छ राहील याची याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी. ‘इंडियन स्वच्छता लीग'च्या कार्यक्रमात ज्याप्रमाणे स्वच्छतेसाठी सर्व विद्यार्थी एकत्रित येऊन देशात पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थी सहभागाचा विक्रम प्रस्थापित केला, तीच परंपरा कायम राखत आपण सर्व मिळून स्वच्छ सर्वेक्षणातही देशात पहिल्या क्रमांकाचे ध्येय गाठण्यासाठी कटिबध्द होऊया. - राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.