संविधान दिनानिमित्त निबंध, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक देशातील आगळेवेगळे स्मारक असल्याचे अभिप्राय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच नागरिकांनी भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केल्यानंतर व्यक्त केले आहेत. बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती' या विचारांवर आधारित स्मारकातील समृध्द ग्रंथालय हा अनमोल असा खजिना आहे. याठिकाणी विविधांगी वैचारिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून त्यांना सर्व स्तरांतील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.

      असाच एक अभिनव उपक्रम 26 नोव्हेंबर रोजीच्या संविधान दिनाचे औचित्य साधून राबविण्यात येत आहे. भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणारी आहेत. यादृष्टीने भारतीय संविधानाविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जाणीव जागृती व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त ‘निबंध, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे.

      नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याकरिता आयोजित या स्पर्धांकरिता (1) भारतीय संविधानाचे महत्त्व, (2) माझे संविधान, माझा अभिमान आणि (3) संविधान निर्मिती आणि बाबासाहेब - असे तीन विषय देण्यात आलेले आहेत.

‘निबंध स्पर्धा’ मध्ये या तीन विषयांपैकी एका विषयावर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत निबंध सादर करता येतील. 4 गटांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात येत असून इ. 5 वी ते 8 वी चा प्राथमिक शालेय गट, इ. 9 वी व 10 वी चा माध्यमिक शालेय गट यांच्या स्पर्धा आयोजनाचे नियोजन नमुंमपा शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन व खुल्या गटाच्या स्पर्धांचे नियोजन समाजविकास विभागामार्फत करण्यात येत आहे. निबंधाकरिता कमाल शब्दमर्यादा प्राथमिक शालेय गटाकरिता 300 शब्द, माध्यमिक शालेय गटाकरिता 1000 शब्द, महाविद्यालयीन गटाकरिता 1000 शब्द व खुल्या गटाकरिता 2000 शब्द इतकी आहे.

‘घोषवाक्य स्पर्धा’ प्राथमिक शालेय गट, माध्यमिक शालेय गट, महाविद्यालयीन गट तसेच खुला गट या चारही गटांमध्ये आयोजित करण्यात आली असून संविधानविषयक मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतील 1 घोषवाक्य स्पर्धक सादर करू शकतात.   

‘वक्तृत्व स्पर्धा’ या इ. 5 वी ते 8 वी चा प्राथमिक शालेय गट, इ. 9 वी व 10 वी चा माध्यमिक शालेय गट अशा दोन गटात घेण्यात येणार असून मराठी अथवा हिंदी भाषेतील सादरीकरणाचा कालावधी कमाल 5 मिनिटे असणार आहे. नमुंमपा शिक्षण विभागामार्फत वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन करण्यात येत असून प्रत्येक गटातील निवडक स्पर्धकांची अंतिम फेरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दि. 25 नोव्हेबर रोजी संपन्न होणार आहे.

प्राथमिक व माध्यमिक शालेय गटांसाठी तिन्ही स्पर्धा आयोजनाची संपूर्ण कार्यवाही नमुमपा शिक्षण विभाग यांच्यामार्फत होत असून स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी खुशाल चौधरी यांचेशी 9867922415 या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

महाविद्यालयीन तसेच खुल्या गटासाठी निबंध आणि घोषवाक्य स्पर्धा आयोजनाची कार्यवाही समाजविकास विभागामार्फत होत असून या स्पर्धेतील सहभागाकरिता स्पर्धकांनी आपले निबंध व घोषवाक्य दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजी, सायं. 5 वा. पर्यंत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ग्रंथालय, सेक्टर 15, ऐरोली येथे अथवा समाजविकास विभाग, पहिला मजला, बेलापूर भवन, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर येथे सादर करावयाचे आहेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी दशरथ गंभिरे यांचेशी 9702309054 या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

प्रत्येक स्पर्धेकरिता प्रत्येक गटातील 5 विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात येणार असून या स्पर्धांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भारतीय संविधनाविषयी आपल्या मनात असलेला अभिमान, त्याचे महत्व अधोरेखित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.  

    

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मान्यता प्राप्त चार संघटना निवडणुकीच्या मैदानात