३३० दिव्यांग व्यक्तींना स्टॉलचे वितरण

नवी मुंबई ः दिव्यांगांसाठी लोककल्याणकारी भूमिका जपणारी महापालिका अशी नवी मुंबईची ओळख असून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वयंरोजगाराद्वारे आर्थिक बळ देण्यासाठी महापालिकेच्या वतीने जागा आणि स्टॉल उपलब्ध करुन देण्याकरिता सोडत (लॉटरी) काढण्यात आली. ३ टप्प्यात अत्यंत पारदर्शक पध्दतीने झालेल्या या सोडतीमध्ये तब्बल ३३० दिव्यांग व्यक्तींना स्टॉलचे वितरण करण्यात आले. जवळपास साडेसहा तास नॉनस्टॉप चाललेली सदर सोडत अत्यंत सुव्यवस्थित रितीने पार पडली. सोडतीनंतर अनेक दिव्यांग व्यक्तींनी महापालिकेने पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत सदरचा दिव्यांगांसाठी ऐतिहासिक सुवर्णक्षण असल्याची भावना मांडली.

सोडतीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन देण्याकरिता महापालिकेच्या वतीने ‘सिडको'कडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याविषयी माहिती दिली. तर मालमत्ता विभागाचे उपायुवत दादासाहेब चाबुकस्वार यांनी सादरीकरणाद्वारे संपूर्ण प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.

नवी मुंबई महापालिका मार्फत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन देण्याकरिता प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहीर सुचनेनुसार ७१४ दिव्यांगाचे अर्ज प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने २० डिसेंबर २०१९च्या महापालिका सर्वसाधारण सभा ठराव अन्वये प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली होती. सदर प्रतिक्षा यादीला मान्यता देताना महासभेने दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन देण्याकरिता ‘सिडको'कडून जागा प्राप्त झाल्यानंतर, लॉटरी पध्दतीने जागा वाटप करण्यास आणि महापालिका क्षेत्रातील कायम रहिवाशी दिव्यांगास प्रथम प्राधान्य, त्यानंतर उर्वरित घटकांना जागा वाटपाच्या धोरणास मान्यता दिली होती.

त्यानुसार ‘सिडको'कडून जागा प्राप्त करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.‘सिडको'मार्फत स्टॉल या प्रयोजनासाठी राखीव ठेवलेले १४ भूखंड बाजारभावाने उपलब्ध करुन घेण्यात आले. यामध्ये ऐरोली, सेवटर-६ मधील भूखंड क्र.८बी/८जी, २ए, ४२४ सेवटर-२ई मधील भूखंड क्र.४५७ तसेच वाशी सेवटर-१ मधील भूखंड क्र. ३ बी, ३ बी-१, सेवटर-१७ मधील भूखंड क्र. ८५बी, २, ६१/१३, सीबीडी-बेलापूर विभागात सेवटर-१५ मधील भूखंड क्र.७२ ए, ७२ बी, नेरुळ विभागात सेवटर-१८ए मधील भूखंड क्र.१५३, तुर्भे विभागात सानपाडा, सेवटर-२३ मधील भूखंड क्र.७, कोपरखैरणे, सेवटर-१४ मधील भूखंड क्र.३७ आणि घणसोली, सेवटर-४ मधील भूखंड क्र.५२६ अशा १४ भूखंडाचा समावेश आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी दिव्यांगांना केवळ जागा न देता स्टॉलसुध्दा उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली.  

त्यानंतर प्रतिक्षा यादीवरील दिव्यांगाकडून २ जून ते ८ जुलै २०२२ या कालावधीत हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार पूर्वीच्या महापालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असलेल्या १७१ दिव्यांग व्यक्तींच्या यादीमधील मयत आणि एकाच कुटुंबातील ५ अर्जदार वगळता १६६ अर्जदार तसेच हरकती-सूचना नंतर कायमस्वरुपी यादीमध्ये वर्ग झालेले १६४ अर्जदार अशा एकूण ३३० दिव्यांगाची जागा, स्टॉल वाटपाची सोडत १० नोव्हेंबर रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे सर्वांसमक्ष पारदर्शक पध्दतीने संपन्न झाली. यावेळी पात्र दिव्यांगाची त्यांच्या सहाय्यकांसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी विभागनिहाय स्टॉलच्या चिट्ठीची समान आकाराची गुंडाळी करुन त्या पारदर्शक ड्रममध्ये टाकण्यात आल्या. यानंतर विभागनिहाय यादीतील दिव्यांग व्यक्तीचे नाव जाहीर करुन सर्वांसमक्ष शालेय विद्यार्थ्यांमार्फंत एकेक स्टॉलची चिट्ठी उचलण्यात आली आणि दिव्यांगाला मिळालेल्या स्टॉलच्या विभागाचे नांव, भूखंड क्रमांक आणि स्टॉल क्रमांक जाहीर करण्यात आले. तसेच दिव्यांगांना त्याचवेळी जागा वाटप झाल्याबाबतचे सूचनापत्र देण्यात आले.

प्रथम फेरीमध्ये एकूण १३६ जागांचे वाटप तर दुसऱ्या फेरीमध्ये ११८ जागांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे तुर्भे आणि कोपरखैरणे येथे उपलब्ध जागांच्या संख्येपेक्षा अर्जदाराची संख्या जास्त असल्याने इतर विभागांमध्ये शिल्लक राहिलेल्या जागा एकत्रित करुन तिसऱ्या फेरीमध्ये ७६ जागांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी प्रथमतः सन २००३ मध्ये दिव्यांगांना १७१ जागा उपलब्ध करुन दिलेल्या होत्या. दिव्यांगांचा सदर करारनामा संपुष्टात आल्यानंतर, सन २०१९ मध्ये एकूण ११० दिव्यांगांच्या करारनाम्याचे नुतनीकरण करण्यात आले. त्यानंतर आता ३३० दिव्यांगांना जागा आणि स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संविधान दिनानिमित्त निबंध, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन