ठाणे जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी जाहीर
ठाणे ः भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातील मतदारांची एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या एकूण ६१ लाख ३४ हजार ९५५ झाली असून यादीत शंभर टक्के मतदारांची छायाचित्रे असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या ३३ लाख २८ हजार ००९ इतकी असून महिला मतदारांची संख्या २८ लाख ६ हजार ०९३ इतकी आहे. तर ८५३ इतर मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील मतदारांचे लिंग गुणोत्तर प्रमाण ८४३ इतके आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार नोंदणीमध्ये वाढ झाली असून या यादीत ३१ हजार ७८ दिव्यांग मतदारांना चिन्हांकित करण्यात आले आहे.
सदर प्रारुप मतदार यादी विधानसभा मतदार संघ कार्यालय, महापालिका, शासकीय कार्यालय, आदि ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहेत. यामध्ये काही दुरुस्ती असल्यास संबंधित मतदारांनी संबंधित केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक तो अर्ज भरुन आपले नाव दुरुस्त करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ६ हजार ३९१ मतदान केंद्रे आहेत. सदर मतदान केंद्रे दिव्यांगस्नेही करण्यात आली असल्याचेही शिनगारे यावेळी सांगितले.
मतदार यादीतील तपशिलासोबत आधार क्रमांकाची जोडणी करण्याचे आवाहन...
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दरम्यान मतदारांना आधार क्रमांकाची जोडणी करणेसाठी ६-ब अर्ज भरण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आधार क्रमांक मतदारयादीतील तपशिलासोबत जोडणी करावा. यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप, एनव्हीएसपी आणि व्होटर पोर्टल या ऑनलाईन सुविधांचा वापर देखील करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
मतदारयादीतील वैशिष्ट्येः
मतदारयादी मध्ये १०० % मतदारांची छायाचित्रे.
संपूर्ण राज्यात ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक इतर (तृतीयपंथी) ८५३ मतदार संख्या.
मतदारयादीमध्ये महिलांच्या मतदार नोंदणी वाढ. मतदायादीत लिंग गुणोत्तरामध्ये ८३८ वरुन ८४३ इतकी वाढ.
मतदारयादीमध्ये दिव्यांग मतदारांची नोंदणीमध्ये वाढ. जिल्ह्यामध्ये एकूण ३१,०८७ दिव्यांग चिन्हांकीत.
ठाणे जिल्ह्यामध्ये मतदानकेंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्ण. जिल्ह्यामध्ये ६३९१ मतदान केंद्र.
ठाणे जिल्ह्यात ५५६९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी.