एकाहून अधिक भाषा येणे हे आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य - प्रा. अब्दुस सत्तार दळवी
नवी मुंबई : मराठी व उर्दू या माझ्या दोन्ही मातृभाषा असल्याचे मी विविध मुलाखतींतून अभिमानाने सांगतो. एकाहून अधिक भाषा येणे हे आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. कोणतीही बोली-भाषा ही छोटी नसते आणि भाषा कुणाची मक्तेदारीही नसते असे ठाम प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे उर्दू भाषा माजी विभाग प्रमुख प्रा.अब्दुस सत्तार दळवी यांनी वाशी येथे केले. ६ नोव्हेंबर रोजी येथील गुरव ज्ञाति सभागृहात प्रा. दळवी यांच्या हस्ते तळोजा येथील साहित्यिक इकबाल शर्फ मुकादमलिखित ‘धागा' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर सार्वजनिक वाचनालय कल्याणचे कार्यवाह भिकू बारस्कर, साहित्यप्रेमी सुधीर कदम, कोमसाप-खेडचे कार्यकारिणी सदस्य रौफ खतीफ, दै. ‘आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत उपस्थित होते.
मुकादम यांच्या या मराठीतील साहित्य रचनेचे कौतुक करतानाच उर्दू व मराठी या भाषांतील पुस्तकांचे एकमेकांच्या भाषांत भाषांतर वाढत्या प्रमाणावर होत जावे अशी अपेक्षा व्यक्त करुन आपण ज्येष्ठ साहित्यिक विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण' या कादंबरीचे, पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री'चे तसेच ‘पसायदाना'चे उर्दूत भाषांतर केले असल्याचे समाधान वाटते असेही प्रा. दळवी यावेळी म्हणाले. अशा भाषांतरांतून भारतीय सभ्यता, संस्कृतीचे इतरांना दर्शन होईल असे त्यांनी सांगितले. भावना, वेदना ह्यांना भाषेची बंधने नसतात. जाति-धर्माच्या भिंती ओलांडून त्यांचे आवाहन सर्वांनाच होत असते असे सांगून राजेंद्र घरत यावेळी केलेल्या भाषणात म्हणाले की साहित्य हे हिंदू, मुस्लिन, ख्रिश्चन वगैरे नसते. ते निव्वळ साहित्य असते. त्याची भाषा भले वेगवेगळी असेल. मात्र आपण रसिक वाचकांनी चांगल्या साहित्याला दाद द्यायला हवी, ते उत्तम झाले आहे हे त्या त्या साहित्यिकाला आवर्जून कळवायला हवे अशी सूचना घरत यांनी यावेळी केली व ‘धागा' या पुस्तकातील भाषा ओघवती, प्रवाही, संवादी असल्याचे मत मांडले. आपल्या गावी, रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील कोलथरे येथे काही सुविधांचा अभाव असल्याचा उल्लेख करुन करोना काळात आपण अनेक माणसे गमावली, अनेकांना उपचार घेऊन आर्थिक दूरवस्थेचा सामना करावा लागल्याचे ‘धागा' या कवितासंग्रहाचे रचनाकार इकबाल शर्फ मुकादम यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी भिकू बारस्कर, सुधीर कदम, रौफ खतीफ यांनीही आपल्या भाषणांतून मुकादम यांच्या कवितासंग्रहास शुभेच्छा देत त्यांची अनेक पुस्तके येवोत असे विचार मांडले. या कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीताने करण्यात आला. ‘धागा'मधील कवितानुरुप विविध वेधक रेखाचित्रे काढणाऱ्या गणेश म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिक्षा बोर्डे यांनी नेटके सूत्रसंचालन केले, तर इकबाल मुकादम यांची कन्या निशात मुकादम हिने आभार मानले.