‘नैना'च्या २३ गावांमध्ये युडीसीपीआर लागू करावा- शेतकऱ्यांची मागणी

 नैना विरोधात गावागाांमध्ये बंद आंदोलनाला प्रतिसाद

नवीन पनवेल ः नैना विरोधात गावागावांमध्ये गांव बंद आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असून नैना नकोच अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. नैना क्षेत्रातील गावांमध्ये युडीसीपीआर लागू करावा, अशी मागणी राजेश केणी आणि शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच ६० टक्के जागा ‘नैना'ला देणार नसल्याची भूमिका देखील घेण्यात आली आहे.

‘नैना'मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्याचा फायदा तालुक्याला सर्व नागरिकांना समान मिळावा आणि लाखो लोक येथे रहायला आले तर त्यांना पाणी कुठून देणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला. ‘नैना'ने अद्याप पाण्याची व्यवस्था केलेली नाही. विचुंबे येथील ८० टक्के जागेवर बांधकाम झालेले आहे. येथील बांधकाम परवानगी रद्द करण्यात आलेली असून पूर नियंत्रण पट्टा येथे केले असल्याचे सांगण्यात आले. नदीच्या पलिकडे परवानग्या मिळतात, मग आम्हाला परवानगी का मिळत नाही? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे नैना विरोधात आंदोलन करायचे असून आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे. गावातील गुरचरण जागा देखील ‘नैना'मध्ये जाणार आहेत. आम्ही गावाच्या जमिनी फुकट द्यायच्या का? येथील पिके घेणारी जमीन देखील जाणार असल्याने येथील शेतकरी उध्वस्त होणार आहे.

नैना म्हणजे ‘सिडको'ने बिना भांडवली स्थापन केलेली कंपनी आहे. ‘नैना'ला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. ‘नैना'च्या अधिकाऱ्यांना २३ गावांमधील रिडेव्हलपमेंट बद्दलची माहिती नसल्याने त्यांनी तसे नियोजन केले नाही. नैना नियोजन शून्य आहे. सुकापूरला ३० माळ्याच्या इमारती झाल्या आहेत.मात्र, रिडेव्हलपमेंट साठी ४ ते ५ मजली इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली जात नाही. यात कोणता विमान अडकणार आहे का? असा सवाल यावेळी संतप्तशेतकऱ्यांकडून विचारण्यात आला.

आज संघर्ष केला तरच उद्याचा दिवस चांगला येईल. आंदोलनाचा पाया मजबूत करुया, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जनता हीच ताकद असून जागे व्हा, घरी झोपत बसू नका, क्रिकेट टीमने देखील आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकरी नष्ट करण्याची योजना ‘नैना'ची असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी विचुंबे ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका शिक्षण विभागाने आजवर हजारो विद्यार्थ्यांना विना मान्यता शिक्षण दिले आहे का ?