उरण मधील खोपटे भागामध्ये पाणथळ क्षेत्रांवर भराव घालून आणि खारफुटींना नष्ट करुन पार्किग लॉट

खारफुटींच्या जागांवर पार्किग लॉट

नवी मुंबई ः पर्यावरणवाद्यांनी उरण मधील खोपटे भागामध्ये पाणथळ क्षेत्रांवर भराव घालून आणि खारफुटींना नष्ट करुन त्यावर उभारल्या जाणाऱ्या कंटेनर्सच्या पार्किग जागेविरोधात आवाज उठवला आहे. यासंदर्भात ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने ई-मेल द्वारे तक्रार करण्यात आली. यानंतर सदर तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सदर तक्रारीवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ. महेंद्र कल्याणकर कोकण विभागीय आयुक्त असून ते उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी आणि पाणथळ क्षेत्र समित्यांचे देखील अध्यक्ष आहेत. त्यामुळे या समित्यांकडे सुध्दा ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने स्वतंत्ररित्या तक्रार केली.

अंदाजे १५० मीटर लांब आणि १५ मीटर रुंदीचा पट्ट्याला अवैधरित्या बुजवले गेले आहे. पार्किगसाठी असे भराव टाकणे, त्याचप्रमाणे अवैधपणे पैसे गोळा करण्यासाठी स्थानिक माफिया कार्यरत आहेत. मच्छीमार समाजाचे समुद्राला हाताळण्याचे चॅनल ‘जेएनपीए'च्या विकासामुळे बंद झाल्याने मच्छीमार समाजाला तग धरुन राहण्यासाठी दुर्धर परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ‘श्री एकविरा आई प्रतिष्ठान'चे अध्यक्ष तथा ‘महाराष्ट्र लघु पातळी पारंपारिक मच्छीमार कामगार युनियन'चे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सांगितले. अशाच पध्दतीने धुतूम येथे खारफुटीचा मोठा पट्टा बुजवून त्यावर पाकर्िंगसाठी जागा बनविण्यात आली आहे. पर्यावरणवादी आणि स्थानिक मच्छीमार यांच्याकडून वारंवार खारफुटींच्या नाशाविरुध्द होणाऱ्या गुन्ह्यांविरुध्द वारंवार ॲलर्ट देऊन देखील सदर क्षेत्रातील निरीक्षण यंत्रणा निष्फळ ठरत असल्याची खंत बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे.

उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समित्यांच्या नियमित बैठका होत नसल्यामुळे पाणथळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना आणखीन खतपाणी मिळत असल्याचे सांगत रायगड जिल्हाधिकारी आणि पाणथळ समिती खोपटेमध्ये पाणथळावर घालण्यात आलेले भराव काढून टाकण्यात यशस्वी होतील, असा विश्वास बी. एन. कुमार आणि नंदकुमार पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच खोपटे आणि पागोटे आंतरभरती क्षेत्रांना तात्काळ पाणथळ क्षेत्रे सूचित करुन जैवविविधता आणि मच्छीमार समाजाच्या हितासाठी त्यांचे जतन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महिला कर्मचाऱ्यांना वाहतूक शाखा कार्यालयाच्या उद्‌घाटनाचा मान