आमदार निधीतून लवकरच बेलापूर मतदारसंघात सीसीटिव्हींचे जाळे -आ.मंदाताई म्हात्रे

तुर्भे गांव येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण

नवी मुंबई ः शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. याअंतर्गत तुर्भे, सेक्टर-२२, २४ येथे ५० लाखाच्या आमदार निधीतून लावण्यात आलेल्या एकूण ३६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उद्‌घाटन सोहळा तुर्भे गावातील रामतनू माता मैदान येथे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत तुर्भे गावचे माजी सरपंच डी. डी. घरत यांच्या शुभहस्ते २३ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेविका सौ. विजया घरत, दिलीप पाटील, माजी नगरसेवक दीपक पवार, ‘भाजपा युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, ‘भाजपा महिला मोर्चा'च्या जिल्हाध्यक्षा दुर्गा डोख, राजेश राय, निर्मला सुतार, शोभा पाटे, सुरेश अहिवले, आदि उपस्थित होते.

माझ्या आमदार निधीतून बेलापूर मतदार संघातील प्रत्येक विभागात शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तुर्भे विभागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यापूर्वी वाशी आणि सानपाडा विभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. तसेच नेरुळ आणि शिरवणे येथील विभागात सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्याचेही येत्या ३-४ दिवसात लोकार्पण करण्यात येणार आहे. तुर्भे, नेरुळ गांव, सीवुडस्‌, सीबीडी-बेलापूर येथेही सीसीटीव्ही कॅमेरे प्रस्तावित आहेत, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली.

नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये, उद्याने, तलाव, बस डेपो, रेल्वे स्टेशन परिसर, सोसायटी चौक, शासकीय कार्यालये, हॉटेल परिसर, मंडई, बाजार, चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. नागरिकांची वाढत्या गुन्हेगारीच्या त्रासापासून मुक्तता व्हावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तरतूद करीत असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण मधील खोपटे भागामध्ये पाणथळ क्षेत्रांवर भराव घालून आणि खारफुटींना नष्ट करुन पार्किग लॉट