ऑनलाईन बांधकाम परवानगी प्राप्त करण्यामध्ये वापरकर्त्यांस येणाऱ्या अडचणी ऑटो डिसीआर प्रणालीद्वारे दूर

महापालिका तर्फे बीपीएमएस प्रणालीद्वारे विकास कामांच्या प्रस्तावांची छाननी

नवी मंुबई ः नवी मुंबई महापालिकेला प्राप्त होणाऱ्या विकास कामांच्या प्रस्तावांची छाननी शासन निर्देशानुसार बीपीएमएस प्रणालीद्वारे ऑनलाईन होत आहे. सदर बीपीएमएस प्रणालीची अंमलबजावणी शासन निदेशानुसार १ जुलै २०२२ पासून नवी मुंबई महापालिका मार्फत सुरु करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने १२ ऑगस्ट २०२२ रोजीच्या पत्रान्वये बीपीएमएस संगणकप्रणाली व्यतिरिक्त सॉफ्ट टेक कंपनीने तयार केलेली ऑटो डीसीआर प्रणाली वापरण्यास मान्यता दिलेली आहे. या प्रणालीचा उपयोग करुन ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याच्या कार्यवाहीस सुरुवात करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महापालिकेतही सदर कार्यप्रणाली नियमितपणे राबविली जावी यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून या प्रणालीद्वारे ऑनलाईन बांधकाम परवानगी प्राप्त करण्यामध्ये वापरकर्त्यांस येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. याबाबतच्या कार्यप्रणालीची माहिती व्हावी याकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नगररचना विभागामार्फत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिका मुख्यालयातील नगररचना विभागाच्या संमेलन कक्षात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सदर कार्यशाळेत नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना काेकाण यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका मांडत या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर व्हावा याकरिता नवी मुंबई महापालिका सर्व संबंधित प्राधिकरणांशी समन्वयाचे काम करीत असून या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर होऊन विकास प्रस्तावांची छाननी सुनियोजित पध्दतीने आणि सहज सुलभरित्या व्हावी असा प्रयत्न असल्याचे सांगितले.

याप्रसंगी सहाय्यक संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण यांच्या समवेत नगररचना विभागातील सर्व उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. सॉफ्टटेकच्या वतीने निखील कापसे, अंकित पटाणी, सचिन सिनकर यांनी या प्रणालीची विस्तृत माहिती देत तिच्या वापराविषयी मार्गदर्शन केले. तसेच ऑटो डिसीआर संगणक प्रणालीमधील काही वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती यावेळी देण्यात आली. प्रीडीसीआर स्वतंत्र सॉफ्टवेअरमध्ये जे ऑटोकॅड वास्तुविशारद वापरतात, त्या आवृत्तीशी सुसंगत असून ऑटो डिसीआर संगणक प्रणालीमध्ये सादर करण्यापूर्वी सदर नकाशे प्रमाणित करुन घेण्यात येतात. प्रत्येक प्रकल्पाचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करता येते. सदर संगणक प्रणाली वापरकर्त्यांना समजण्यास आणि वापरण्यास अत्यंत सोपी आहे.

 नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वास्तुविशारद आणि विकासक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महापालिका नेहमीच कटीबध्द असते. लवकरच वास्तुविशारद यांनादेखील सॉफ्टटेकच्या वतीने प्रशिक्षण देण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. बीपीएमएस संगणक प्रणालीसह सॉफ्टटेक कंपनीने तयार केलेली ऑटोडीसीआर प्रणाली देखील नवी मुंबई महापालिकेत वापरण्यास सुरुवात केलेली आहे. याचा उपयोग विकास प्रस्तावांची छाननी आणि पुढील कार्यवाही करण्यासह वास्तुविशारद आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात होईल. -सोमनाथ काेंकाण, सहाय्यक संचालक-नगररचना विभाग, नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माथाडी कामगार कायदा टिकवण्यासाठी संयुक्तपणे बैठक घेण्याची मागणी