के.बी.पी.कॉलेज येथे शिवजन्मोत्सव सप्ताह निमित्ताने शिवव्याख्या संपन्न
के.बी.पी.कॉलेज येथे शिवजन्मोत्सव सप्ताह उत्साहात साजरा
तुर्भे : कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी येथे शिवजन्मोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शुभदा नायक, उपप्राचार्य प्रा. सी.डी. भोसले, उपप्राचार्या डॉ. राजश्री घोरपडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी व चेअरमन डॉ. एल. व्ही. गवळी आदी उपस्थित होते.
शिवजन्मोत्सव सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविले गेले. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पारायण सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. तसेच स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, महिला संरक्षण प्रशिक्षण शिबीर, गड किल्ले संवर्धन (माहुली गड), कापडी पिशव्या वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आले. पारायण सोहळ्याचे औचित्य साधून विजयराव देशमुख लिखित 'शककर्ते शिवराय' या पुस्तकाचे पारायण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रातःकाली शिवज्योत महाविद्यालयात आणण्यात आली. याप्रसंगी शिवगर्जना देऊन आणि शिवआरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात लेझीम सादर करून ढोल-ताशा पथका द्वारे मानवंदना देण्यात आलीआणि सभागृहामध्ये शिवजन्माचा पाळणा, पोवाडा, जागर, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच शिव व्याख्याते वक्ते सुदर्शन भोईर यांचे उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी असे शिवव्याख्यान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी एन.एस.एस. चे डॉ. पी.जी. भाले, प्रा.एन. नलवडे, एन.एस.एस. युनीटचे स्वयंसेवक ओमकार गोळे, नेहा जांभळे आणि अन्य विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.