३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

 ‘आरोग्याचा महायज्ञ'द्वारे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा

नवी मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यात ‘आरोग्याचा महायज्ञ'द्वारे साजरा करण्यात आला. राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियान सुरु आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' या योजनेच्या विस्ताराची घोषणा देखील केली. राज्यातील सगळ्या घटकांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी सदर सारे उपक्रम, मोहिमा आपण हाती घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे सांगितले.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी त्यांनी सदर माहिती दिली. याप्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्यासह राज्यभरातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आपल्या सरकारची वाटचाल सुरु आहे. सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असे आरोग्यविषयक विविध उपक्रम आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या पुढाकारातून राज्यभर हाती घेण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. मुंबई पाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालय ठिकाणी आपला दवाखाना सुरु होणार असून सुमारे ५०० ठिकाणी ‘आपला दवाखाना'चा शुभारंभ होणार आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. राज्यात सुमारे ३६६ ठिकाणी महारक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र नेहमीच रक्तसंकलनात देशात अग्रेसर असतो. तो यापुढेही राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी रक्तदात्यांचे आभारही मानले. याशिवाय राज्यातील सुमारे १८०० शाळांमधील १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रबाले आणि दिघा एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात नागरी समस्या