सर्वच विभागांमध्ये लोकसहभागातून महापालिकेचा वैशिष्ट्यपूर्ण कचरा वर्गीकरण जनजागृती उपक्रम
‘चालता बोलता स्वच्छता'द्वारे नवी मुंबई महापाहिका कचरा वर्गीकरण जनजागृती उपक्रम
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ओला, सुका आणि घरगुती घातक अशा ३ प्रकारे कचऱ्याचे निर्मितीच्याच ठिकाणी म्हणजे आपल्या घरातच वर्गीकरण होणे गरजेचे असून त्यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वच विभागांमध्ये लोकसहभागातून वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. अशाच प्रकारचा स्वच्छता विषयी सहजपणे जनजागृती करणारा ‘चालता बोलता स्वच्छता' असा अभिनव उपक्रम कोपरखैरणे विभागात १ फेब्रुवारी पासून राबविण्यास सुरुवात झाली असून तो महापालिका आणि शेल्टर असोसिएटस् यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत रेल्वे स्टेशन, मार्केट, उद्याने, शाळा-महाविद्यालय परिसर अशा वर्दळीच्या ठिकाणी सायं ५ ते ७ या वेळेत महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी, कर्मचारी तसेच शेल्टर असोसिएट्सचे प्रतिनिधी असा ६-७ जणांचा समूह जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहे. यामध्ये सुरुवातीला जनजागृती करुन माहिती दिली जाते. तसेच त्यानंतर उपस्थितांना स्वच्छतेविषयी सहज सोपे प्रश्न विचारुन त्यांना स्वच्छता साहित्य स्वरुपात आकर्षक बक्षिसे दिली जात आहेत. अशाच प्रकारे वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून त्यांना स्वच्छता विषयी प्रश्न विचारुन योग्य उत्तरे देणाऱ्या नागरिकांनाही बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले जात आहे.
‘चालता बोलता स्वच्छता' स्वच्छतेविषयी माहिती देणारा आणि नागरिकांना प्रोत्साहित करणारा आगळावेगळा उपक्रम नागरिकांच्या पसंतीस पडला असून सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तुर्भे विभागाचे स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे यांच्या संकल्पनेतून सदर अभिनव उपक्रम शेल्टर असोसिएशनच्या सहयोगाने राबविला जात आहे. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले आहे. तुर्भे विभागाचे स्वच्छता निरीक्षक जयेश पाटील, विजय दुर्लेकर, भूषण पाटील, धनंजय खरे यांच्यासह तुर्भे विभागातील स्वच्छता कामांचे सर्व पर्यवेक्षक तसेच ‘शेल्टर असोसिएटस्'च्या धनश्री गुरव, अमोल गाडे, मंगेश कदम, मनिषा सुर्वे, सोनी भोसले, अश्विनी गायकवाड, मेघा वंजारे आदिंच्या माध्यमातून सदर उपक्रम यशस्वीरित्या राबविला जात आहे.