‘स्वच्छतेसाठी पुढाकार नागरिकांचा, एक दिवस स्वच्छताकर्मीच्या सन्मानाचा’ महास्वच्छता अभियान

कोपरखैरणे, नेरूळ विभागातील नागरिक स्वच्छतेसाठी रस्त्यावर

नवी मुंबई : स्वच्छता कामगारांचा सन्मान करीत त्यांना नेहमीच्या शहर स्वच्छतेच्या कामापासून एक दिवसाची मुक्तता देत त्यांच्या कामाची जबाबदारी नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वत: स्विकारण्याचा अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ आणि कोपरखैरणे विभागात यशस्वीरित्या संपन्न झाला.

या महास्वच्छता अभियानात सकाळी 6.30 वाजल्यापासून कोपरखैरणे व नेरुळ विभागात हजारो स्वच्छताप्रेमी नागरिक स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यारस्त्यांवर उतरले आणि या दोन्ही विभागांमध्ये जणू स्वच्छतेची लाट निर्माण झाली. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे व नेरुळ विभागाचे विभाग अधिकारी सुनिल पाटील तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर  नागरिकांसमवेत या स्वच्छता अभियानात उत्साहाने सहभागी झाले व महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्या एकत्रित सहयोगातून बघता बघता रस्ते, चौक स्वच्छ झाले.

‘स्वच्छतेसाठी पुढाकार नागरिकांचा, एक दिवस स्वच्छताकर्मीच्या सन्मानाचा’ हे ध्येय वाक्य नजरेसमोर ठेवून वाशी व बेलापूर विभागाच्या पावलावर पाऊल टाकीत कोपरखैरणे व नेरुळ विभागात हे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी व प्रतिनिधी, स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिक, लोकप्रतिनिधी, शाळा – महाविद्यालयांचे शिक्षक व विद्यार्थी, मॉल्स, हॉटेल्स तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांचे मालक व कर्मचारी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. कोपरखैरणे विभागात 2400 हून अधिक नागरिक तसेच नेरुळ विभागात 3250 हून अधिक नागरिक यांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे घोषवाक्य स्वकृतीतून सिध्द केले.

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नवी मुंबई महापालिकेला आजवर मिळालेल्या राष्ट्रीय सन्मान पुरस्कारांमध्ये दैनंदिन स्वच्छतेचे कर्तव्य सेवाभावी वृत्तीने पार पाडणा-या स्वच्छताकर्मींच्या समर्पित भावनेने केलेल्या कामाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याचा यथोचित सन्मान केला जावा व ते करीत असलेल्या कामाची अनुभूती घेता यावी या दोन्ही दृष्टीने हा महास्वच्छता अभियानाचा उपक्रम अत्यंत महत्वाचा असून यामुळे स्वच्छताकर्मींची सहसंवेदना जाणून घेता आली अशी भावना अनेक नागरिकांनी अभियानामध्ये सहभागी झाल्यानंतर व्यक्त केली.

कोपरखैरणे विभागात यावेळी डी - मार्ट सर्कल ते रा.फ.नाईक शाळा ते से. 8 ते से. 5 रेल्वेस्टेशन ते अण्णासाहेब पाटील सभागृहपर्यंत 340 हून अधिक स्वच्छताकर्मींनी रॅली काढून स्वच्छतेचा प्रचार केला. कचरा वर्गीकरणाचे महत्व, प्लास्टिक प्रतिबंधाची गरज, ओल्या कच-याची कम्पोस्ट बास्केट वापरून घरच्या घरी अथवा सोसायटीच्या आवारात कम्पोस्ट पीट्सव्दारे विल्हेवाट अशा स्वच्छताविषयक अनेक महत्वाच्या गोष्टींविषयी फलक उंचावत तसेच घोषणा देत स्वच्छताकर्मींनी जनजागृती केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा आणि वृत्तपत्र लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न