हेल्थकेअर क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

 गुणवत्तापूर्ण शिक्षण भारती विद्यापीठाची विशेषता -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नवी मुंबई ः गुणवत्तापूर्ण शिक्षण भारती विद्यापीठाची विशेषता असून हेल्थकेअर क्षेत्रातही भारती विद्यापीठाची वाटचाल उत्कृष्टपणे सुरु आहे, असे गौरवोद्वगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघर येथे काढले. भारती विद्यापीठच्या खारघर, सेक्टर-१० (कोपरा) येथील अत्याधुनिक अशा मेडिकव्हर हॉस्पिटलच्या उद्‌घाटन सोहळ्यात अध्यक्षस्थानाहून उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, मेडिकव्हर समुहाचे अध्यक्ष फेड्रिक स्टेन्मो, भारती विद्यापीठचे कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे सचिव आमदार डॉ. विश्वजीत कदम, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, नृपाल पाटील, आनंदराव पाटील, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, सह-व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाच्या संचालक सौ.स्वप्नाली कदम, भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ.विलासराव कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

हेल्थकेअर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. कोरोना संकटानंतर हेल्थकेअर क्षेत्रात अधिक काम करण्याची आवश्यकता लक्षात आली, त्यानुसार आपली वाटचाल सुरु झाली आहे. हेल्थकेअर क्षेत्रात देखील
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरु करण्यात आला आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला आरोग्य उपचारांसाठी निश्चित होणार आहे. इतर प्रगतशील देशांच्या तुलनेत भारतात कमी खर्चात उपचार होवू शकतात. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही हेल्थ इन्स्टिट्यूटचे महत्व अनन्यसाधारण आहे. आरोग्य क्षेत्रामुळे अर्थ व्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून दोन लाखापर्यंतचे हेल्थ इन्शुरन्स गरिबांना मिळत आहे. सामान्य नागरिकांकरिता हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हेल्थ केअर क्षेत्र हेल्थ टुरिझमच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. या हेल्थ टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे मेडिकव्हर सारख्या संस्था तयार होणं गरजेचं असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ.विश्वजीत कदम यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच मेडिकव्हर हॉस्पिटलची मालिका विदर्भातही यावी, यासाठी आवाहन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मेडिकव्हर हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.अनिल कृष्णा, भारती विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, मेडिकव्हर समुहाचे अध्यक्ष फेड्रिक स्टेन्मो, कौन्सिल जनरल ऑफ स्वीडन निकपॉल ॲनावारिया, आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन भारती विद्यापीठ मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सर्व संबंधितांना शुभेच्छा दिल्या. तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फित कापून आणि दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक भारती विद्यापीठाचे सचिव आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. यावेळी भारती विद्यापीठ आणि मेडिकव्हर समुह यांनी एकत्रित केलेल्या कामांची माहिती देणारी ध्वनीचित्रफित सादर करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आरोग्य शिबिरास नागरिकांचा मोठया प्रमाणात सहभाग