कर्नाळा अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवास संवर्धनाला प्राधान्य देत परिपूर्ण आराखडा तयार

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाबाबत वनमंत्र्यांकडे बैठक

नवी मुंबई ः कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटन सुविधांच्या बळकटीकरणासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे १९ जानेवारी रोजी आयोजित बैठकीत वनमंत्री  मुनगंटीवार बोलत होते. याप्रसंगी आमदार महेश बालदी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिम गुप्ता, सहसचिव भानुदास पिंगळे, उपवनसंरक्षक सरोज गवस, आदि उपस्थित होते.

कर्नाळा अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवास संवर्धनाला प्राधान्य देत परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे सूचित करुन कर्नाळा परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी अलिबाग येथील वन विभागाची मान्यता घ्ोवून स्थलांतर करावे. कोणत्याही परवानग्या, मान्यता वन विभागाकडून प्रलंबित राहता कामा नये. कर्नाळा किल्ल्याची डागडुजी, दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी सादरीकरण केले. आराखड्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क, मुलांची खेळाची जागा, धबधबे, पुलांची दुरुस्ती, पाथवे, बचत गटांचे कॅन्टीन, प्रवेशद्वारावर आणि परिसरात सीसीटीव्ही, विद्युतीकरण, पक्षी निरीक्षण पॉईंट आदिंचा समावेश आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल पासून १२ कि.मी. तर मुंबईपासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे मुंबईसह आसपासचे हजारो पर्यटक भेट देत असतात. कर्नाळा पक्षी अभयारण्यातील कर्नाळा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. १२.१०९४ चौरस कि.मी. क्षेत्राच्या या अभयारण्यामध्ये पक्षांच्या १४७ प्रकारच्या जाती आहेत. हिवाळ्यात ३७ स्थलांतरीत पक्षी येथे पहावयास मिळतात. विविध प्रकारच्या ६४२ वृक्षप्रजाती येथे आहेत. ११ प्रकारचे सस्तन प्राणी, २३ प्रकारचे सर्प, ५ प्रकारचे सरडे आणि बेडूक, १० प्रकारचे कोळी आणि फुलपाखरांच्या ५६ प्रजातीही येथे अस्तित्वात आहेत. या सर्वांचे जतन करुन निसर्ग पर्यटन आराखडा अंतिम करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या पदाधिकाऱ्यांसमवेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवांदे यांच्या कार्यालयात धडक