कलाकार, तंत्रज्ञान यांचा मेळावा संपन्न
नवी मुंबईत कलाकार, तंत्रज्ञान यांच्या मेळाव्याचे आयोजन
नवी मुंबई ः ‘फिल्म अँड थिएटर फेडरेशन'च्या वतीने नवी मुंबई, ठाणे आणि रायगड मधील कलाकार, तंत्रज्ञ यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वाशीमध्ये पार पडलेल्या सदर मेळाव्याला अनेक मान्यवर, कलाकार, तंत्रज्ञ यांची उपस्थिती होती.
कलाकारांचे क्षेत्र आता मर्यादित राहिले नसून चित्रपट, नाट्य, लघुपट, टिव्ही मालिका यांच्या पलीकडे ते आता गेले आहे. सोशल मिडीया तसेच ओटीटीच्या माध्यमातूनही अनेक कलाकार आता आपली कलाकृती सादर करीत आहे. असे करीत असतानाच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर बाब लक्षात घेऊन ‘फिल्म अँड थिएटर फेडरेशन'ने मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर मेळाव्याला नवी मुंबई, ठाणे आणि रायगड मधील अनेक कलाकार तंत्रज्ञांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी अनेक कलाकार, तंत्रज्ञांनी आपल्या समस्या मांडल्या तर काही कलाकारांनी आपली कलाकृती सादर केली.
अशा प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन नियमित करण्यात येईल, असे ज्येष्ठ अभिनेत्री तथा या मेळाव्याच्या मुख्य आयोजिका नयन पवार यांनी सांगितले. तर शीतल सातपुते आणि सचिन गायकवाड यांनी मेळाव्याच्या आयोजनासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडली.
सदर कार्यक्रमाला ‘अखिल भारतीय चित्रपट महामंडळ'चे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नाट्य निर्माते जनार्दन लवंगारे तसेच इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.