नेरुळ प्रभाग क्र.३४ मधील रहिवाशांना सातत्याने पाणीटंचाईची समस्या

सारसोळे मधील पाणी प्रश्न निकाली

 नेरुळ ः नेरुळ, सेक्टर ६ सारसोळे गांव आणि गांवठाण परिसरात कमी दाबाने होणारी पाणी पुरवठा समस्या दूर होण्यासाठी पामबीच सर्व्हिस रोड ते झुलेलाल मंदिर दरम्यान अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ ५ जानेवारी रोजी जेष्ठ नागरिक आणि महिला भगिनींच्या  हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेविका सुजाता पाटील, जयश्री ठाकूर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

नेरुळ प्रभाग क्र.३४ मधील रहिवाशांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनियमित आणि कमी दाबाने  होणाऱ्या पाणी समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. सदर समस्येचे गांभीर्य ओळखून माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका सुजाता पाटील आणि माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे सारसोळे गांव, सेक्टर-६ गांवठाण परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यात आला आहे.

महापालिका मार्फत पामबीच सर्व्हिस रोड ते झुलेलाल मंदिरापर्यंत अतिरिक्त जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मोरबे धरणातील जलवाहिनीवरुन या ठिकाणी थेट जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरज पाहता परिपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी अतिरिक्त जलवाहिनी मधील पाणीपुरवठा उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती सुरज पाटील यांनी दिली.

आमदार गणेश नाईक यांच्या महापालिका आयुक्तांबरोबर नवी मुंबईतील नागरी समस्यांवर होणाऱ्या साप्ताहिक बैठकांमधून पाणी समस्या  प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी चालना मिळाली. पाणीटंचाईच्या मुद्द्यावर सुरज पाटील यांनी सदर प्रश्नावर नेहमीच महापालिकेच्या सभांमधून आक्रमक भूमिका घ्ोतलेली आहे. महापालिका आयुक्त आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. त्याचेच फलित म्हणून सारसोळे, सेक्टर-६ गांवठाण परिसरातील पाणीटंचाई संपुष्टात येणार आहे. एक महिन्यात सदरचे काम पूर्ण होईल, असा विश्वास सुरज पाटील यांनी व्यक्त केला.

ज्यावेळेस जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला महापालिकेच्या सभागृहात पाठवले, त्यावेळेसच नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आमच्यावर आली आणि त्या अनुषंगाने प्रयत्न केला.
-सुरज पाटील, माजी नगरसेवक-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आयएनएस विक्रांत जहाज प्रतिकृतीचे मंत्रालयात प्रदर्शन