नवी मुंबईत चैन स्नॅचींग करणा-या लुटारुंच्या कारवायात पुन्हा वाढ
चैन स्नॅचींग करणा-या लुटारुंची वाढली दहशत
नवी मुंबई : नवी मुंबईत चैन स्नॅचींग करणाऱया लुटारुंच्या कारवायात पुन्हा वाढ होऊ लागली असून या लुटारुंनी मंगळवारी सकाळी अवघ्या 15 मिनीटामध्ये ऐरोली परिसरातील तीन व्यक्तींच्या अंगावरील दागिने लुटून नेल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या तीन्ही घटना ऐन सकाळच्या वेळेस घडल्याने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणा-या नागरिकांमध्ये या लुटारुंची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या लुटारुंचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ऐरोली सेक्टर-19 मधील कलशपार्क इमारतीत राहणारे विजय नलवडे (47) हे मंगळवारी सकाळी मंगळवारी सकाळी 6.30 वाजता आपल्या मुलीला सोसायटीच्या गेटवर सोडण्यासाठी गेले होते. मुलीला शाळेच्या बसमध्ये सोडल्यानंतर विजय नलवडे हे आपल्या सोसायटीत परतत असतानाच रेल्वे स्टेशनकडे जाण्याचा रस्ता विचाण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंनी नलवडे यांच्या जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचुन पलायन केले. यावेळी नलवडे यांनी सदर लुटारुंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघे लुटारु गावदेवी मैदानाच्या दिशेने पळुन गेले. त्यामुळे नलवडे यांनी तत्काळ रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली.
त्यानंतर या लुटारुंनी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ऐरोली सेक्टर-19 मधील युरो स्कुल समोर मॉर्निंग वॉक करत रस्त्याने पायी चालत जाणा-या सलील सुधाकर चौधरी (60) यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचुन नेली. त्यानंतर या लुटारुंनी त्याच भागात मॉर्निंग वॉक करणा-या सुरेंद्र दत्तात्रय वारे (60) यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाच्या सुमारे 50 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या चैन खेचुन पलायन केले. सदर लुटारुंनी अवघ्या 15 मिनीटामध्ये तीन व्यक्तींच्या अंगावरील दागिने लुटून पलायन केल्याचे व सदर लुटारुंनी तोंडावर रुमाल बांधले असल्याचे आढळुन आले आहे.
या तिन्ही घटना एकाच लुटारुंनी केल्याचे आढळुन आल्याने रबाळे पोलिसांनी या प्रकरणात एकच गुन्हा दाखल करुन सदर लुटारुंचा शोध सुरु केला आहे. मात्र नवी मुंबईत चैन स्नॅचींगच्या घटनांत पुन्हा वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये या लुटारुंची दहशत निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे चैन स्नॅचींग करणा-या लुटारुंवर कारवाई करण्याची व ऐरोलीच्या सेक्टर-19 व आजुबाजुच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडुन करण्यात येत आहे.