नाताळ निमित्त सुहित जीवन ट्रस्टच्या गतिमंद विद्यार्थ्यांना मॅकडोनाल्ड तर्फे पार्टी

नुतन वर्ष व नाताळ निमित्त सुहित जीवन ट्रस्टच्या गतिमंद विद्यार्थ्यांना मॅकडोनाल्ड तर्फे आयोजित केली पार्टी.

उरण : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या " सुहित जीवन ट्रस्ट " या बौध्दिक अक्षम म्हणजे गतिमंद मुलांच्या संस्थेमध्ये दरवर्षी ख्रिसमस व नूतन वर्षाची पार्टी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. 

मात्र यावर्षी पनवेल येथील ओरायन मॉल मधील मॅकडोनाल्ड तर्फे देण्यात आलेल्या खास आग्रहास्तव नाताळ व नुतन वर्षानिमित्त गतिमंद विद्यार्थ्यांसोबत  दिनांक ३० डिसेंबर रोजी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी मॅकडोनाल्डच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गतिमंद मुलांसोबत अतिशय उत्साहात पार्टी साजरी केली. या पार्टीला सुहित जीवन ट्रस्ट संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक, विश्वस्त तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी मॅकडोनाल्डसच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुंदर सजावट करून अत्यंत जिव्हाळ्याने संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 

विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांच्या तालावर सुंदर नृत्याविष्कार सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. जिंकलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देखील देण्यात आली. सर्व विदयार्थी व शिक्षकांना मॅकडोनाल्ड मधील विविध प्रकारचा अल्पोपहार देण्यात आला. 

विद्यार्थ्यांना मॅकडोनाल्डची छोटी सफर देखील घडवण्यात आली. मॅकडोनाल्डचे मालक व संपूर्ण स्टाफने सुद्धा विद्यार्थ्यांसोबत अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. ओरायन मॉल व मॅकडोनाल्डच्या संपूर्ण टिमकडून सर्व विद्यार्थ्यांना नूतन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुहित जीवन ट्रस्ट पेणच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा पाटील यांनी मॅकडोनाल्डचे आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू