ऐरोलीतील फ्लेमिंगो बोट सफर सुरू
नवी मुंबई :- नवी मुंबई शहराच्या खाडी किनाऱ्यावर दरवर्षी थंडीत स्थलांतरित परदेशी फ्लेमिंगो पक्षांचे आगमन होत असते. त्यामुळे या पक्षांचे आणि येथील जैवविविधतेचे निरीक्षण करता यावे म्हणून येथील जैवविविधता केंद्रा मार्फत फ्लेमिंगो बोटिंग सफर सुरू करण्यात आली आहे. मात्र काही कारणास्तव यंदा ही बोट उशिराने सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असतात. त्यामुळे आता या शहराची ओळख फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास आहे. थंडीची चाहूल लागताच फ्लेमिंगो शहरात स्थलांतर होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा पाऊस लांबल्याने फ्लेमिंगो शहरात स्थलांतरित होण्यासाठी विलंब झाला होता. नवी मुंबई शहराला लाभलेला खाडी किनारा आणि जैवविविधता यांची महिती उपलब्ध होण्यासाठी ऐरोलीमध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. येथून फ्लेमिंगो पक्षी पर्यटकांना पाहता यावे यासाठी ऐरोली मध्ये फ्लेमिंगो बोट सफर सुरू करण्यात आली आहे. ऐरोली मध्ये पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता बेलापूर येथेही फ्लेमिंग बोटिंग सफर सुरू करण्यात आली आहे. बेलापूर येथील बोटिंग १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली होती. मात्र ऐरोली येथील बोटींग सफर काही तांत्रिक कारणास्तव प्रतीक्षेत होती. मात्र सोमवार दिनांक १९ डिसेंबर पासून ही बोटिंग सफर सुरू करण्यात आलेली आहे आणि याला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आगाऊ बुकिंग केली जात आहे.