आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, दळणवळण आदि सुविधा कामांची पडताळणी करुन प्रस्ताव तयार करण्याचे आयुक्त नार्वेकर यांचे आश्वासन
१११ प्रभागांमधील नागरी सुविधा कामांसाठी महापालिका आयुवतांना साकडे
नवी मुंबई ः नवी मुंबईतील सर्वच्या सर्व १११ प्रभागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि समाजसेवकांनी प्रभागनिहाय आवश्यक समस्या आणि नागरी कामांची लेखी निवेदने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे सादर केली. यावेळी आमदार गणेश नाईक यांनी सूचना केल्याप्रमाणे सुचविलेल्या आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, दळणवळण आदि सुविधा कामांची पडताळणी करुन प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासन आयुक्त नार्वेकर यांनी दिले.
आमदार नाईक यांची महापालिका आयुक्तांबरोबर १३ डिसेंबर रोजी ६७ वी बैठक होती. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदि उपस्थित होते. नाईक यांनी प्रभागातील नागरी कामांचा विषय उपस्थित करत काही प्रभागांमध्ये तब्बल १०० कोटींची कामे करण्यात आली तर काही प्रभागांमध्ये ५० लाखांची कामे देखील झालेली नाहीत, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. सर्वच प्रभागांना समान न्याय मिळायला पाहिजे यासाठी १११ प्रभागातील लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे हाती घ्ोऊन त्याचे प्रस्ताव तयार करण्याची सूचना त्यांनी आयुक्तांना केली. सुचविण्यात आली आहेत.
वन टाइम प्लॅनिंग संकल्पनेतून बेलापूर, सेक्टर-१५ चा दर्जेदार नागरी सुविधायुक्त विकास करण्यात आला. या विकसित नोड प्रमाणेच नवी मुंबईतील अन्य नोड देखील विकसित करावेत. प्रत्येक नोडवर ५० कोटी रुपये अशी याप्रमाणे पाचशे कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने करावी ,अशी सूचना नाईक यांनी केली. अलिकडेच महापालिका प्रशासनाने बारवी धरण प्रकल्पग्रस्तांना तत्परतेने महापालिकेच्या सेवेत कायम केले. परंतु, नवी मुंबईतील सिडको आणि ‘एमआयडीसी'चे १३१ प्रकल्पग्रस्त अद्यापही कायम होण्याच्या प्रतिक्षेत आहे. या कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करावे. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण साफसफाई आणि अन्य खात्यातील ठोक मानधन तत्वावर काम करणारे तसेच अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील कायम करण्याची आग्रही मागणी नाईक यांनी केली.
बारवी धरणातून नवी मुंबई शहराला ठरल्याप्रमाणे पाणीसाठा मिळतो का? सदर बाब तपासण्याची मागणी नाईक यांनी आयुक्तांकडे केली. नवी मुंबईला किती पाणीसाठा मिळतो अन्य शहरांना किती पाणीसाठा मिळतो? याची माहिती देखील घेण्याचे सूचित केले. नागरिकांच्या गरजेच्या वेळेस महापालिकेची रुग्णवाहिका सेवा वेळेवर भेटत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे महापालिकेची रुग्णवाहिका सेवा सक्षम करण्याची गरज आहे. वेळ पडली तर ग्लोबल टेंडर काढून २४ तास चांगली रुग्णवाहिका सेवा देण्याची सूचना त्यांनी केली.
पाणीवापर मोजण्यासाठी महापालिकेने जलमापके बसवली आहेत. परंतु, अनेक ठिकाणी जलमापके नादुरुस्त किंवा ती चोरीला गेली आहेत. अशा ठिकाणी नागरिकांनीच खर्च करुन ती जलमापके आणून देण्याचा तगादा महापालिकेने लावला आहे. अशा जलमापकांचा आर्थिक भुर्दंड नागरिकांवर लादू नका तर महापालिकेने स्वःखर्चाने जलमापके बसवून द्यावीत, अशी मागणीही नाईक यांनी बैठकीत केली. दरम्यान, महापालिकेतील काही अधिकारी दबंगगिरी करुन स्थानिक आणि भूमीपुत्र ठेकेदारांवर अन्याय करीत आहेत. अधिकारी त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देत आहेत. अधिकाऱ्यांची गुंडगिरी सहन करणार नाही असा इशारा देतानाच नवी मुंबईच्या विकासामध्ये प्रसंगी तोटा सहन करुन योगदान देणारे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना महापालिकेच्या कामांमध्ये सहभागी करुन घेण्याची मागणी नाईक यांनी आयुक्तांकडे केली.