" बोली" आगरी भाषेतील कथासंग्रहाचे आगळे वेगळे प्रकाशन
नवी मुंबई : लेखक अरविंद पाटील यांच्या आगरी भाषेतील " बोली" या कथासंग्रहाचे काल ( ता 29 ) कोपरखैरणे येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रकाशन झाले. अत्यंत साध्या आणि घरगुती पद्धतीने सर्व प्रकारचा बडेजाव टाळत झालेल्या प्रकाशन सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
लेखक अरविंद पाटील यांच्या " बोली" या कथासंग्रहाचे काल समाजातील कर्तबगार महिलांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले . या प्रसंगी जयश्री पाटील, संजाली पाटील, राजश्री बुबेरा, रंजिता दुधकर, शर्मिला म्हात्रे, दक्षा पाटील , किमया बुबेरा व लेखक अरविंद पाटील हे उपस्थित होते.
" बोली" हा संपूर्ण आगरी भाषेत लिहिला गेलेला कथासंग्रह आगरी समाज जीवनाचे प्रतिबिंब असल्याचे लेखक अरविंद पाटील यांनी सांगितले. मुळात आगरी समाज हा पुरोगामी विचारांचा समाज असून बदलत्या काळात आणि शहरीकरणामुळे समाजातील चांगल्या प्रथा आणि परंपरा लयास चालल्या आहेत. त्यांचे संवर्धन करणे व विसरत चाललेल्या आगरी भाषेचे साहित्य छापील स्वरूपात संवर्धन व्हावे या हेतूने आपण हे पुस्तक संपूर्ण आगरी भाषेत लिहिले असल्याचे लेखकांनी सांगितले.
पुस्तकाची प्रस्तावना मोहन कोळी यांनी केली आहे तर आकर्षक मुखपृष्ठ प्रसिध्द चित्रकार सुरेश पाटील यांनी साकारले आहे. पुस्तकाचे मूल्य दोनशे रुपये असून हस्र प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे.