शहरातील रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाऱ्यावर

नवी मुंबई :-  २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईसह सर्व ठिकाणच्या रेल्वे स्थानकामधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. परंतु  कालांतराने या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत गेले आणि नवी मुंबई  परिसरातील अत्याधुनिक रेल्वे स्थानकांची देखील हीच अवस्था झाली असून स्थानकांची  सुरक्षा आज वाऱ्यावर पडली आहे. सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले बंकर सुरक्षा रक्षकांविना ओस पडलेले आहेत.त्यामुळे  २६ /११ सारखा हल्ला पुन्हा झाला तर त्याला कसे तोंड देणार असा सवाल आता प्रवासी वर्गातून केला जात आहे.

नवी मुंबई शहरात सिडकोच्या माध्यमातून अत्याधुनिक रेल्वे स्थानके उभारली गेली आहेत. या स्थानकात इतर कार्यालये देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे प्रवाशांसोबत इतर नागरिक देखील रेल्वे स्थानकात ये जा करत असतात. २००८ साली अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला केला होता. त्यात ताज हॉटेलसह छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाचा समावेश होता आणि याच स्थानकात अजमल कसाब ने निष्पाप नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता आणि दहशतवादी हल्ल्यानंतर  मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती. त्याच आधारे नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकातील सुरक्षा देखील कडक केली होती. येथील सर्व  स्थानकात बंकर तयार करून त्यात शस्रधारी सुरक्षा रक्षक तैनात असायचे. मात्र कालांतराने या सुरक्षेकडे  दुर्लक्ष होत गेले आणि हे बंकर ओस पडले आहेत. त्यामुळे  २६ /११ सारखा हल्ला पुन्हा झाला तर त्याला कसे तोंड देणार असा सवाल आता प्रवासी वर्गातून केला जात असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी होत आहे

आधी रेल्वे स्थानकामध्ये सर्व प्रवाशांच्या बॅग तपासल्या जात होत्या. परंतु आता  त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रात्री  स्थानका बाहेर  शेकडो भिकारी आश्रय घेत आहेत. तसेच फेरीवाल्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. 

सध्या रेल्वे पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ आहे. तरी देखील हाय अलर्ट दिवशी या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असतात. आता लवकरच  रेल्वे पोलीस भरती होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अधिक सुरक्षा रक्षक तैनात ठेवले जातील. - संभाजी कटारे, रेल्वे पोलिस निरीक्षक,mवाशी.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोळी महासंघाचे अध्यक्ष व भाजपा आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश