भारतीय संविधान विषयक निबंध, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

नवी मुंबई ः प्रत्येक भारतीय नागरिकाला आपलेसे वाटणारे संविधान आपल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करुन देते. संविधान विषयी आपण शाळेत असल्यापासून माहिती घेत असतो. एक जबाबदार नागरिक म्हणून संविधानातील मूल्यतत्वांविषयी जाणीवजागृती व्हावी यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेने ‘संविधान दिन'चे औचित्य साधून आयोजित केलेल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत १७०० हुन अधिक नागरिक, विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभागी होत संविधान विषयी आपला अभिमान आणि प्रेम व्यक्त केले. याबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्पर्धेतील विजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.

महापालिकेच्या वतीने भारतीय ‘संविधान दिन'चे औचित्य साधून पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी आयुक्त राजेश नार्वेकर बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, लेखक-वक्ते सुरेश सावंत, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, ठाणे जिल्हा समाजकल्याण विभाग सहा. आयुक्त समाधान इंगळे आदिंच्या हस्ते पारितोषिके प्रदान करुन स्पर्धा विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

संविधान दिन निमित्त महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याकरिता आयोजित स्पर्धांकरिता भारतीय संविधानाचे महत्त्व, माझे संविधान, माझा अभिमान आणि संविधान निर्मिती आणि बाबासाहेब असे तीन विषय देण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धेत महापालिका शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी २८९ स्पर्धकांमधून शाळा क्र. २० तुर्भेगांवची विद्यार्थिनी श्रावणी उंबरकर तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी २२५ स्पर्धकांमधून शाळा क्र.१०३ ऐरोलीची विद्यार्थिनी हर्षदा हारुगडे या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
खाजगी शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी २५९ स्पर्धकांमधून श्रीराम विद्यालय ऐरोलीची विद्यार्थिनी अनुष्का भैय्ये तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी ३१६ स्पर्धकांमधून ज्ञानविकास विद्यालय कोपरखैरणेची विद्यार्थिनी प्रणाली जाधव या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.  

महाविद्यालयीन गटात सहभागी ७ स्पर्धकांमधून कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशीची विद्यार्थिनी सायली कांबळे तसेच खुल्या गटात सहभागी १५३ स्पर्धकांमधून विश्रांती चांगण या पहिल्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्रत्येक गटात प्रथम ३ क्रमांक आणि २ उत्तेजनार्थ अशी ५ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

वक्तृत्व स्पर्धेत महापालिका शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी १३६ स्पर्धकांमधून शाळा क्र.७८ गौतमनगरची विद्यार्थिनी अंशीका यादव तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी ९७ स्पर्धकांमधून शाळा क्र.१०६ कोपरखैरणेची विद्यार्थिनी तनुजा पाटील या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. खाजगी शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी १३३ स्पर्धकांमधून नवी मुंबई विद्यालय, वाशीची विद्यार्थिनी नितु सोलंकी तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी ११८ स्पर्धकांमधून संजीवनी विद्यालय, दिघाचा विद्यार्थी अभिजीत डोळस प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छताकर्मींना आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे